✍️✨🌿जनार्दन माऊलींच्या अग्निपरीक्षा 🌿✨✍️
जनार्दन आपले ऐकत नाही, आपली अवज्ञा करतो, आपल्या पारिवारीक ईच्छेच्या विरूध्द वागतो हा प्रचंड अपमान वाटल्याने बाजीराव पाटलांनी आप्पा पाटलांच्या कानावर घालुन कपटनाटय मांडले. त्या अंतर्गत स्वामींचा प्रचंड छळ सुरू केला. खोलीत कोंडुन ठेवणे, अन्नपाण्यावाचुन व्याकुळ करण्याचे प्रयत्न झाले. मातृहृदयाला हे दुःख कसे सोसवेल? जनार्दनांचा छोटा भाऊ दत्तुबाबाकडे म्हाळसा मातेने चटणी भाकरीची वळकटी करून फटीतुन पोहोचविण्याची युक्ती केली.
तहान भुकेचा केला कंटाळा - शिव नामाचा मांडला सोहळा । ऐशा संतांना देवाचा लळा - जो बाळा जो जो रे जो ॥
या मायबहिणींनी गुणगुणलेल्या शब्दांनुसार स्वामीजी होतेच. अन्नपाणी देहासाठी आवश्यक आहे हे मान्य, पण केवळ त्याच शक्तीवर देह चालतो का? मग अन्नपाणी सतत सेवन करणारांचे देह मृत्युमुखी का पडतात? याचा अर्थ अन्न पाण्याने मिळणारी शक्ती सिमीत असते. मर्यादित असते. मग अमर्याद शक्ती या देहात कोणती असते? अर्थात आत्मबल. जे स्वामीजींच्या ठायी प्रकट झालेले होते. स्वामीजी आत्मबल संपन्न होते. ज्याच्या अंतःकरणात अखंड नामस्मरणाचा दिवा प्रज्वलित असतो, त्याला बाह्य संकटे फार काळ डगमगवू शकत नाहीत. देह उपाशी राहू शकतो, पण भगवंताशी जोडलेला आत्मा कधी उपाशी राहत नाही. म्हणूनच संतांचा आधार हा अन्नावर नसून नामावर असतो. बाह्य जगाला ते अशक्य वाटते, पण परमेश्वराशी एकरूप झालेल्या जीवासाठी तेच सहज साध्य असते.
म्हाळसा गुपचुप जनार्दनाला बंद खोलीत भाकरी पाठविते याची चाहुल बाजीराव पाटलांना लागली व त्याचा गैरफायदा घेण्याची योजना आखली. विषयुक्त भाकरी पाठविण्यात ते यशस्वी झाले पण स्वामीजींना उचित सल्ला देणारे काही विरळ भाविक होते. त्यापैकी स्वामीजींवर नितांत श्रध्दा असणारी ब्राम्हण मावशी होय. त्यांना विषप्रयोगाची कुणकुण लागली व छोटी चिठ्ठी फटीतुन टाकुन त्यांनी स्वामीजींना संकटाची सूचना दिली. आईचे हृदय हे शेवटी आईचेच असते. एका बाजूला संसाराचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला लेकराच्या वेदना… या संघर्षात म्हाळसा माता अक्षरशः तुटत होती. संतांच्या जीवनात आईचे स्थान फार विलक्षण असते. कारण ती प्रथम भक्त असते आणि नंतर माता. जनार्दनांच्या रूपात तिलाही काहीतरी दैवी जाणवत होते, म्हणूनच ती सर्व संकटांच्या आडूनही आपल्या लेकरासाठी धडपडत होती.
आता काय करायचे? रात्रंदिवस बाजीरावांना एकच ध्यास, जनार्दनाला अपंग करावे, अधु करावे किंवा कायमचे संपवुन टाकावे. चित्रविचित्र कल्पना त्यांच्या मनात घोळत होत्या. पेटलेल्या कचऱ्या काटयांच्या ढिगात जाळण्याचा प्रयत्न विफल झाला. स्वामीजींवर अशी अनेक आघात करण्याची योजना नविन युक्त्यांनी कार्यान्वित करण्यात येत होती, पण सर्व विफल होत असे.
जको राखे साईया । मार सके ना कोय ।
कृपाळु गोविंद उभा मागे पुढे ।
काहीच साकडे पडो नेदी ॥
या संत वाक्याची प्रचिती यावी असे स्वामीजींचे चरित्र आहे. त्या प्रसंगांचे स्मरण, चिंतन, लेखन करतांना भावनावेग वाढतो व लिखाण मंदावते म्हणुन आपण त्या त्या प्रसंगांना केवळ स्मरणाने स्पर्श करून पुढे जाऊ या.... जग ज्यांना समजून घेत नाही, त्यांची प्रथम परीक्षा घेतली जाते. संतांचा मार्ग हा नेहमीच अग्निपरीक्षेचा राहिलेला आहे. संत तुकाराम महाराजांना उपहास सहन करावा लागला, ज्ञानेश्वर माऊलींना समाजाने वाळीत टाकले, मीराबाईंना विषाचा प्याला देण्यात आला. कारण संतांचे तेज हे सामान्य नजरेला सहन होत नाही. पण ज्यांच्यामागे ईश्वर उभा असतो, त्यांना जगातील कोणतीही शक्ती संपवू शकत नाही.
सर्वांतर्यामी "शिव" पाहण्याचा श्रध्दाभाव असल्याने स्वामीजींचे दृष्टी समोर वैरभाव तत्क्षणी विरघळुन जायचा. विभिन्नतेवर विक्षिप्ततेवर विवेकाचा विजय व्हायचा. कसोटी लागल्या शिवाय किंमत कशी कळणार? ज्याला अंकुरीत व्हायचे त्याने गाडुन घेण्याची तयारी ठेवावी जसे धान्याचे बीजाचे होते तव्दत. तेजस्वी व्हायचे असेल त्याने जाळुन घेण्याची हिंमत ठेवावी जसे सुवर्णाचे होते तव्दत. भगवद्भक्ताला भय कसले? जो निर्बल आहे त्याला भगवद्द्याप्ती कशी होईल? सात्विक संपत्तीच्या यादीत पहिले नाव आहे "अभयम्". दैवी मुल्यांच्या शक्तीचा आधार असलेला निराधार कसा असेल? अनंतानंत परमेश्वराचे स्वामित्व स्विकारलेले भाग्यवान भक्त अभागी कसे असतील? स्वामीजींच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग हा भक्तासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. संकटे आली म्हणून श्रद्धा सोडायची नसते, उलट संकटांमध्येच श्रद्धेची खरी परीक्षा होत असते. देहाला वेदना होतात, मनाला आघात होतात, पण ज्याच्या अंतरंगात भगवंताचा ध्यास जागृत असतो त्याला कोणतीही अंधारी रात्र फार काळ रोखून धरू शकत नाही.
अस्वस्थ पाटील बंधुंनी आता वेगळी युक्ती आखली. ती युक्ती म्हणजे क्रौर्याचा कडेलोट होता. एका चांडाळाला द्रव्य देवुन मध्यरात्री टोकदार तापलेल्या लोखंडी सळयांनी 'जनार्दनाचे' डोळे फोडुन टाकण्याची योजना आखली. हजारो परिवारातील लाखो भाविकांना परमार्थिक प्रेरणेची दिशा, दशा, दृष्टी देणाऱ्या स्वामीजींचे नेत्र फोडुन कायमचे दृष्टीहीन करणेची योजना नियतीला मानवेल का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा