शुक्रवार, २९ मे, २०२६

भाग -१० अंधाराच्या रात्रीतून सुरू झालेला दिव्य प्रवास


 भाग -१०

     ⚜️✍️☘️अंधाराच्या रात्रीतून सुरू झालेला दिव्य प्रवास☘️✍️⚜️

त्या रात्रीचा अंधार फक्त दहेगावावर उतरला नव्हता, तर तो माणुसकीच्या अंतःकरणावर उतरला होता. एका निष्पाप जीवाचे डोळे फोडून त्याचे आयुष्य कायमचे अंधारात ढकलण्याची योजना आखली जात होती. “डोळे फुटले की हा जनार्दन आपल्या हातात येईल, आपल्या आज्ञेत येईल, आपल्या अंकित होईल, आपल्याच आधाराने जगेल, आपण देऊ त्या उष्टया खरखटया अन्नावर दीनहीन होवुन जगेल,” या आसुरी आनंदाच्या कल्पनेने बाजीराव पाटील मनातल्या मनात नाचु लागला. मानवाच्या क्रौर्यापेक्षा देवाची करुणा मोठी असते, याचाच तो काळ होता.

त्याच ब्राम्हण मावशीच्या वाणीतुन देव बोलला. जनार्दनांना प्रेरणा मिळाली. माहिती मिळाली. कारण त्या कुलकर्णी मावशीचे पती त्याच दहेगावात तलाठी होते. तलाठ्याचे दोन डोळे म्हणजे कोतवाल व जागल्या. गावातील इत्यंभूत माहिती गोळा करणारे हे दोन सेवक सतत स्वामीनिष्ठ असायचे. त्यांना ही कुणकुण लागली. कोतवालाची पत्नी आडोशाचा आधार घेवुन ब्राम्हण मावशीला भेटली. तिच्या डोळयात दुःखाश्रु मावत नव्हते. मुखातुन शब्द उमटत नव्हते.

“काय झाल बाई? का रडते?” ब्राम्हण मावशीच्या प्रश्नांनी भानावर आलेल्या कोतवालाच्या पत्नीने रडत रडत सांगितले, “मावशी, संपले सगळे… घात झाला… जनार्दनाच्या जीवनातील उजेड कायमचा संपविण्यासाठी रात्रीच्या अंधारात अग्नित लोखंडी सळया तापत आहेत. काही तरी करा मावशी… तुम्ही काही तरी करा… तुमच्या पाया पडते…” डोळयातील पाणी पदराने पुसत पुसत ती कुणाला कळायच्या आत अंधाराचा फायदा घेवुन स्वतःच्या घरी पोहोचली. तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे फक्त दुःखाचे नव्हते; ते मानवतेचे शेवटचे थेंब होते. अन्यायाच्या सावलीतही काही अंतःकरणे देवाच्या प्रेरणेने जागी असतात, हे तिच्या कृतीतून दिसून आले.

द्रव्य लोभाने व पाटलांच्या भयाने तो चांडाळ हे क्रूरकर्म करण्यास तयार झाला होता. पेटलेल्या प्रज्वलीत अग्नित दोन टोकदार सळया तापत घातल्या होत्या. त्या आधी त्याने दोन बाटल्या मद्य स्वतःच्या पोटात घातले होते. क्रूरकर्म करतांना अतिरिक्त उन्मादाची आवश्यकता असते. ती दारू प्राशनाने मिळते, ही गोष्ट चांडाळ जाणत होता. मद्याच्या नशेत तो तेथेच चाळवा चाळव करीत होता. हाताच्या मुठीत कपडा घेवुन टोकदार लोखंडी सळया तापतांना कमी राहु नये म्हणुन त्या वर खाली करून चाळवीत होता.

त्या धगधगत्या सळया जशा अग्नीत तापत होत्या, तसतसे जनार्दनांचे जीवनही तप्त होत होते. पण सोने जसे अग्नीतून अधिक तेजस्वी बनते, तसेच संकटांच्या ज्वाळांमधून स्वामीजींचे व्यक्तिमत्त्व अधिक दिव्य होत गेले. त्यांच्या शरीराला जखमा देण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांच्या आत्मतेजाला कुणीही स्पर्श करू शकले नाही.

ब्राम्हण मावशी कडुन मिळालेल्या माहितीवरून मागच्या दाराची कडी तोडुन जनार्दन गुप्त रस्त्याने पळत होते. सर्वाव्यापी शिव त्यांना शक्ती देवुन वेगाने चालवित असावे. मागच्या दाराची तुटलेली कडी ही केवळ लाकडाची नव्हती, तर ती संकटाच्या कैदेतून मुक्त होणाऱ्या जीवनाची सीमा होती. प्रत्येक पाऊल जणू महादेवांच्या कृपेने पुढे पडत होते. काळोख दाटला होता, पण त्यांच्या अंतरात्म्यातील दिवा अजूनही प्रज्वलित होता.

चांडाळाची चाळवा चाळव संपली. सळया पुर्ण तापल्या होत्या, पण स्वामीजींचा चालण्याचा वेग वाढला होता. रिकामी खोली. सर्वच वाया गेले. चांडाळ थरकला, आणि ते कळताच बाजीराव पाटलांचा क्रोधाने थरकाप वाढला. अशा कितीतरी जीवघेण्या घटना वारंवार घडत होत्या. पाटील बंधु बिघडत होते. स्वामीजींचे जीवन तेजोवलयाने वाढत होते, घडत होते.

आता दहेगावी राहणेचे कारण काय? अशा प्रश्नांची उकल करता करता स्वामीजींनी घर, गाव सोडले. दहेगाव सोडुन इतरत्र कोठेतरी निघुन जायचे ठरले. कोठे जायचे हे ठरले नव्हते, कसे जायचे हे ठरले नव्हते, मात्र कशासाठी जायचे हे ठरले असावे. त्याही वेळी शरिरधारण करणेसाठी निवासाची व अन्न-पाण्याच्या आधाराची किंचितशी आवश्यकता होती असे दाखवुन घराबाहेर पडले.

दहेगाव सोडताना जनार्दनांच्या मनात राग नव्हता, सूड नव्हता; फक्त एक विरक्त वेदना होती. ज्या मातीत बालपण रुजले, ज्या रस्त्यांवर पाय वाढले, त्याच भूमीतून एका साधकाला रात्रीच्या अंधारात निघून जावे लागले. पण कधी कधी ईश्वर महान कार्यासाठी आपल्या भक्ताला जन्मभूमीपासून दूर नेत असतो. कारण काही जीव गावासाठी जन्माला येत नाहीत, ते संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी घडविले जातात.

त्या रात्री जनार्दन फक्त दहेगाव सोडून गेले नाहीत, तर संसाराच्या मोहातून बाहेर पडून नियतीच्या नव्या प्रवासाला निघाले. मागे राहिला तो अन्याय, क्रौर्य आणि भीतीचा इतिहास; पुढे सुरू झाला तप, त्याग आणि लोककल्याणाचा दिव्य मार्ग.

 पुढील भाग क्रमशः

#जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनमाऊलींचेचरित्र #चरित्र #जनार्दनस्वामी #जनार्दनस्वामीचेचरित्र

गुरुवार, २८ मे, २०२६

भाग -९ जनार्दन माऊलींच्या अग्निपरीक्षा

✍️✨🌿जनार्दन माऊलींच्या अग्निपरीक्षा 🌿✨✍️
         जनार्दन आपले ऐकत नाही, आपली अवज्ञा करतो, आपल्या पारिवारीक ईच्छेच्या विरूध्द वागतो हा प्रचंड अपमान वाटल्याने बाजीराव पाटलांनी आप्पा पाटलांच्या कानावर घालुन कपटनाटय मांडले. त्या अंतर्गत स्वामींचा प्रचंड छळ सुरू केला. खोलीत कोंडुन ठेवणे, अन्नपाण्यावाचुन व्याकुळ करण्याचे प्रयत्न झाले. मातृहृदयाला हे दुःख कसे सोसवेल? जनार्दनांचा छोटा भाऊ दत्तुबाबाकडे म्हाळसा मातेने चटणी भाकरीची वळकटी करून फटीतुन पोहोचविण्याची युक्ती केली.
     तहान भुकेचा केला कंटाळा - शिव नामाचा मांडला सोहळा । ऐशा संतांना देवाचा लळा - जो बाळा जो जो रे जो ॥
या मायबहिणींनी गुणगुणलेल्या शब्दांनुसार स्वामीजी होतेच. अन्नपाणी देहासाठी आवश्यक आहे हे मान्य, पण केवळ त्याच शक्तीवर देह चालतो का? मग अन्नपाणी सतत सेवन करणारांचे देह मृत्युमुखी का पडतात? याचा अर्थ अन्न पाण्याने मिळणारी शक्ती सिमीत असते. मर्यादित असते. मग अमर्याद शक्ती या देहात कोणती असते? अर्थात आत्मबल. जे स्वामीजींच्या ठायी प्रकट झालेले होते. स्वामीजी आत्मबल संपन्न होते. ज्याच्या अंतःकरणात अखंड नामस्मरणाचा दिवा प्रज्वलित असतो, त्याला बाह्य संकटे फार काळ डगमगवू शकत नाहीत. देह उपाशी राहू शकतो, पण भगवंताशी जोडलेला आत्मा कधी उपाशी राहत नाही. म्हणूनच संतांचा आधार हा अन्नावर नसून नामावर असतो. बाह्य जगाला ते अशक्य वाटते, पण परमेश्वराशी एकरूप झालेल्या जीवासाठी तेच सहज साध्य असते.
     म्हाळसा गुपचुप जनार्दनाला बंद खोलीत भाकरी पाठविते याची चाहुल बाजीराव पाटलांना लागली व त्याचा गैरफायदा घेण्याची योजना आखली. विषयुक्त भाकरी पाठविण्यात ते यशस्वी झाले पण स्वामीजींना उचित सल्ला देणारे काही विरळ भाविक होते. त्यापैकी स्वामीजींवर नितांत श्रध्दा असणारी ब्राम्हण मावशी होय. त्यांना विषप्रयोगाची कुणकुण लागली व छोटी चिठ्ठी फटीतुन टाकुन त्यांनी स्वामीजींना संकटाची सूचना दिली. आईचे हृदय हे शेवटी आईचेच असते. एका बाजूला संसाराचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला लेकराच्या वेदना… या संघर्षात म्हाळसा माता अक्षरशः तुटत होती. संतांच्या जीवनात आईचे स्थान फार विलक्षण असते. कारण ती प्रथम भक्त असते आणि नंतर माता. जनार्दनांच्या रूपात तिलाही काहीतरी दैवी जाणवत होते, म्हणूनच ती सर्व संकटांच्या आडूनही आपल्या लेकरासाठी धडपडत होती.
आता काय करायचे? रात्रंदिवस बाजीरावांना एकच ध्यास, जनार्दनाला अपंग करावे, अधु करावे किंवा कायमचे संपवुन टाकावे. चित्रविचित्र कल्पना त्यांच्या मनात घोळत होत्या. पेटलेल्या कचऱ्या काटयांच्या ढिगात जाळण्याचा प्रयत्न विफल झाला. स्वामीजींवर अशी अनेक आघात करण्याची योजना नविन युक्त्यांनी कार्यान्वित करण्यात येत होती, पण सर्व विफल होत असे.
जको राखे साईया । मार सके ना कोय ।
कृपाळु गोविंद उभा मागे पुढे ।
काहीच साकडे पडो नेदी ॥
        या संत वाक्याची प्रचिती यावी असे स्वामीजींचे चरित्र आहे. त्या प्रसंगांचे स्मरण, चिंतन, लेखन करतांना भावनावेग वाढतो व लिखाण मंदावते म्हणुन आपण त्या त्या प्रसंगांना केवळ स्मरणाने स्पर्श करून पुढे जाऊ या.... जग ज्यांना समजून घेत नाही, त्यांची प्रथम परीक्षा घेतली जाते. संतांचा मार्ग हा नेहमीच अग्निपरीक्षेचा राहिलेला आहे. संत तुकाराम महाराजांना उपहास सहन करावा लागला, ज्ञानेश्वर माऊलींना समाजाने वाळीत टाकले, मीराबाईंना विषाचा प्याला देण्यात आला. कारण संतांचे तेज हे सामान्य नजरेला सहन होत नाही. पण ज्यांच्यामागे ईश्वर उभा असतो, त्यांना जगातील कोणतीही शक्ती संपवू शकत नाही.
        सर्वांतर्यामी "शिव" पाहण्याचा श्रध्दाभाव असल्याने स्वामीजींचे दृष्टी समोर वैरभाव तत्क्षणी विरघळुन जायचा. विभिन्नतेवर विक्षिप्ततेवर विवेकाचा विजय व्हायचा. कसोटी लागल्या शिवाय किंमत कशी कळणार? ज्याला अंकुरीत व्हायचे त्याने गाडुन घेण्याची तयारी ठेवावी जसे धान्याचे बीजाचे होते तव्दत. तेजस्वी व्हायचे असेल त्याने जाळुन घेण्याची हिंमत ठेवावी जसे सुवर्णाचे होते तव्दत. भगवद्भक्ताला भय कसले? जो निर्बल आहे त्याला भगवद्‌द्याप्ती कशी होईल? सात्विक संपत्तीच्या यादीत पहिले नाव आहे "अभयम्". दैवी मुल्यांच्या शक्तीचा आधार असलेला निराधार कसा असेल? अनंतानंत परमेश्वराचे स्वामित्व स्विकारलेले भाग्यवान भक्त अभागी कसे असतील?            स्वामीजींच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग हा भक्तासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. संकटे आली म्हणून श्रद्धा सोडायची नसते, उलट संकटांमध्येच श्रद्धेची खरी परीक्षा होत असते. देहाला वेदना होतात, मनाला आघात होतात, पण ज्याच्या अंतरंगात भगवंताचा ध्यास जागृत असतो त्याला कोणतीही अंधारी रात्र फार काळ रोखून धरू शकत नाही.
            अस्वस्थ पाटील बंधुंनी आता वेगळी युक्ती आखली. ती युक्ती म्हणजे क्रौर्याचा कडेलोट होता. एका चांडाळाला द्रव्य देवुन मध्यरात्री टोकदार तापलेल्या लोखंडी सळयांनी 'जनार्दनाचे' डोळे फोडुन टाकण्याची योजना आखली. हजारो परिवारातील लाखो भाविकांना परमार्थिक प्रेरणेची दिशा, दशा, दृष्टी देणाऱ्या स्वामीजींचे नेत्र फोडुन कायमचे दृष्टीहीन करणेची योजना नियतीला मानवेल का? 
#जनार्दन #जनार्दनमाऊली #janardan #janardanmauli #जनार्दनस्वामीचरित्र #चरित्र 

बुधवार, २७ मे, २०२६

भाग -८ ✨🌿✍️ जनार्दन माऊलींचे बाललीला दिव्यत्व ✍️🌿✨


 

भाग -८
   ✨🌿✍️ जनार्दन माऊलींचे बाललीला दिव्यत्व ✍️🌿✨
         भक्तप्रवर जनूबाळा या वातावरणाशी तसे अपरिचित होते. परंतु मातेचा इशारा आणि आधार भक्तक्रम असल्याने त्यांच्या वागण्या-बोलण्याची सात्विकता सांभाळली गेली.
‘जनार्दने’ भक्तिमय आचार विचारांकडे प्रदूषित दृष्टीने पाहणाऱ्या बाजीराव पाटलांनी आपल्या पाटील यांचे कान भरवण्यास सुरुवात केली. म्हाळसाच्या बाबतीत अशीच कपटवेळी खेळून त्यांनी म्हाळसापासून आपल्या पाटलांना सतत ‘दूर’ ठेवण्याची दक्षता घेतली होती. आता पुत्रापासूनही आपल्या पाटलांना दूर ठेवून त्यांच्या संसारात राख कालविण्याचे उद्योग सुरू झाले. एकांतवेळी सतत बाजीराव पाटील आपल्या पाटलांना जनार्दनाचे नसलेले दुर्गुण व चुकांचा पाढा वाचून दाखवू लागले. सर्वसाधारण असेही घडते की एखाद्या व्यक्तीबद्दल सतत वाईट वृत्त कानावर पडत राहिले की त्या व्यक्तीबद्दल अकारण गैरसमज दृढ होत जातो. आपल्या पाटील यांचे मन जनार्दनाच्या बाबतीत अकारण आस्थी व विद्वेषी बनू लागले. अर्थात त्याच्या मुळाशी व मूळावर बाजीराव होतेच.
जनार्दन आता काम करण्याजोगा झाला, तरीही पोथी, पुराणे, ग्रंथ, टिळा, माळा, भजनाच्या नादी लागतो हे बरे नाही. असा युक्तिवाद आपणांस मान्य करवण्यात बाजीराव पाटील यशस्वी झाले. आपल्या साहेबांचे आता पर्यंतचे अर्धे अधिक आयुष्य घराबाहेर सुख शोधण्यात व संपादन करण्यातच वाया गेले होते. घराकडे, शेती, उद्योगाकडे लक्ष नव्हते. घरात श्रीमंती होती मग कशाला काम करायचे अशी अकर्मण्यता त्यांना अंगवळणी पडली होती. बेताल बाजीराव तर गावाच्या पारावर पाटीलकीच्या उरलेल्या अवसानाने मिजास मिरविण्यात धन्यता पावत होते. गावातील कुटाळांसोबत कुटील कारस्थाने व चवचाल बोलण्यात या चांडाळ चौकडीचे जीवन इतरांना उपद्रवकारक वाढू लागले. भगवद्भजनांच्या टाळांचा ध्वनी या कुटाळांना कंटाळवाणा व अडचणीचा ठरत होता.
नारायण पाटलांच्या पश्चात उभे परिवाराची ही तरुण पिढी निरंकुश झाली. आता सर्व धाक संपला होता. वाडीला त्याला वाडेल तसे वागण्याची सुलभता व अलिखित परवानगी मिळाली होती. दिवसेंदिवस घरातील व शेतातील उत्पन्नाचे स्त्रोत व चैतन्य कमी होत असल्याला सुरुवात झाली. उपद्रव मूल्यांच्या अतिपूर्तीसाठी धनधान्यांची कमतरता भासू लागली. भावा भावांमध्ये मतभेदाचे वारे वाहू लागले. कष्टाची प्रवृत्ती नव्हती. सवय ही नव्हती, पण चोचले पुरविण्यात स्पर्धा होती. स्वतःचे व संसाराचे कधीच हित न पाहणारे आपले पाटील आता जनार्दनांच्या हितासाठी मोठे मोठे गप्पा मारू लागले. त्यासाठी घालून दिलेले काम पूर्ण झाले नाही तर जनार्दनांना मारू लागले.
वयाच्या सिम्पत्या दृष्टीने म्हाळसा मातेच्या सांगण्यावरून जनार्दन आता गाई गुरांचे व शेताचे काही काम करू लागले. मात्र त्या कामातून उसंत मिळताच म्हाळसाच्या मंदिरात भजन, पूजन, आरतीसाठी उपस्थित असायचे. गावात कथा कीर्तनाला जाऊन काळजीपूर्वक सत्संग श्रवण करायचे. हळूहळू गीतांतील काही श्लोक, गाथेतील काही अभंग आणि पंचरत्न हरिपाठ मुखोद्गत झाला. मामांच्या घरात धार्मिक संस्कारात राहिल्याने जनार्दनांची बुद्धी शुद्ध व तीव्र होती. एकदा ऐकले की तात्काळ पाठांतर होण्याइतपत बुद्धीची प्रगल्भता त्यांचे ठायी होती.
जनार्दनांच्या सात्विक स्वभावामुळे गावातील काही सज्जन लोक त्यांच्या जवळ येऊ लागले. त्यांच्या शांत व नम्र वागण्यामुळे अनेकांना त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला. मंदिरातील भजन, आरती आणि हरिनामात ते मनापासून सहभागी होत असत. संतवाङ्मय ऐकण्याची व समजून घेण्याची त्यांची आवड दिवसेंदिवस वाढत होती. संकटे, टोमणे आणि विरोध सहन करूनही जनार्दनांनी आपला संयम ढळू दिला नाही. मातेच्या संस्कारांमुळे त्यांच्या मनात भक्तीबरोबरच मोठ्यांविषयी आदर आणि कर्तव्यभावना दृढ होत गेली. शेतीची व घरातील कामे सांभाळून उरलेल्या वेळेत ते नामस्मरण आणि सत्संगात मन रमवीत असत. संतांच्या सहवासातून त्यांना साधेपणा, नम्रता आणि सेवाभाव यांचे महत्त्व उमजू लागले. कोणाशी कटुता न ठेवता प्रेमाने वागणे, चुकीच्या गोष्टींपासून दूर राहणे आणि मन शांत ठेवणे हा त्यांचा स्वभाव बनत चालला होता.
हे पारलौकिक सूर विरह वादी दिसते. चांगल्या सुसंस्कारामुळे जनार्दनांचे बाजीरावांना दुःख लागले. आयुष्यभर कडवट बोलणे, कडवट ऐकणे आणि दुःख अनुभवायचे आयुष्यच त्यांच्या माथी का करावे? जवाबदारीने जनार्दन कामध्ये सहभागी व्हावे म्हणून त्यांना काम देण्यात येऊ लागले. कुरणे हे जात असून बाजीरावांना अस्वस्थ एक लागली.
कालांतराने काळ, महादेवाचे अभंग, भजने, भारुडे, आरत्या आणि भक्तीचा जनार्दनांवर खूप प्रभाव पडला. काकडआरतीला सर्वात पहिले जनार्दन मंदिरात जाऊन बसत. पूजा, आरती आणि प्रवचन करत असत. पहाटे स्नान करून खांद्यावर घोंगडी घेऊन मंदिरात जातांना व वीणा न कळत गावाला पारलौकिक भाविकता जाणवू लागली. भाविकांच्या मुखाने करणारे जनार्दन हे मार्ग प्रदर्शन विलक्षण प्रभावशाली वाटू लागले।
  पुढील भाग क्रमशः
#जनार्दन #जनार्दनमाऊली #माऊलींचीअमृतवाणी #जनार्दनमाऊलींचीअमुतवाणी 

मंगळवार, २६ मे, २०२६

भाग ७ ✍️⚜️🔱 शिवभक्ती, मातृवेदना आणि संतत्वाची पहिली चाहूल 🔱 ⚜️✍️

✍️🌿✨⚜️ शिवभक्ती, मातृवेदना आणि संतत्वाची पहिली चाहूल ⚜️✨🌿✍️

म्हाळसा मातेला “जनू” आता दहा वर्षांचा झाला होता. पहाट झाली की म्हाळसामाता स्नान करून तुळशी वृंदावनाला पाणी घाली, सूर्यनारायणाला प्रार्थना करी आणि देवघरात समई प्रज्वलित करून मोहिनीराजांच्या चरणी माथा टेकवी. संसारातील दुःख कितीही असले तरी तिच्या मुखावर भक्तीचे तेज कायम दिसत असे. घरातील काम, शेतातील श्रम, जनावरांची सेवा आणि लेकराचे संगोपन यात तिचा दिवस निघून जाई; पण अंतर्मनात एक वेदना सतत जागी होती बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या म्हाळसाला जवळजवळ दहा वर्षे उलटली तरी देहगावच्या पाटील वाड्याकडून कोणतीच विचारपूस नव्हती. संध्याकाळी देवघरातील समईचा मंद प्रकाश पाहताना तिचे मन भरून येई. माझ्या जनुबाळाच्या पाठीवर त्याच्या पित्याचा प्रेमळ हात कधी फिरणार? हा प्रश्न तिच्या अंतःकरणाला सतत टोचत असे.

           रात्री सर्वजण निद्राधीन झाल्यावर ती देवघरात बसून मोहिनीराजांच्या चरणी अश्रू अर्पण करी. तिच्या ओठांवर प्रार्थना असे, पण त्या प्रार्थनेत स्वतःसाठी काही नव्हते; तिची एकच याचना होती  माझ्या जनुबाळाच्या जीवनावर सदैव तुमची कृपाछाया राहो. जनुबाळ मात्र सामान्य बालक नव्हता. त्याच्या वागण्या-बोलण्यात विलक्षण शांतता आणि सात्त्विकता होती. तो खेळत असला तरी त्याच्या मुखातून सहज देवाचे नाव निघत असे. त्याच्या कपाळावरील तेज आणि निरागस हास्य पाहून गावातील वृद्ध मंडळी क्षणभर थांबून त्याच्याकडे पाहत राहायची. काहींना तर त्या बालकाच्या दर्शनाने अंतर्मनात अनामिक शांततेची अनुभूती होत असे. म्हाळसामातेलाही अनेकदा जाणवत असे हे लेकरू साधं नाही याच्या जन्मामागे काही तरी ईश्वरी संकेत आहे.

            त्याच्या डोळ्यांत विलक्षण करुणा होती. बालवय असूनही त्याच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला जणू एखाद्या ज्ञानी संताच्या सान्निध्याचा स्पर्श झाल्याचा अनुभव येई. एक दिवस दुपारच्या वेळेस मोहिनीराजांच्या वाड्यात अचानक लगबग सुरू झाली. देहगावचे नारायण पाटील आले होते. घरातील सर्वजण आदराने त्यांच्या स्वागताला धावले. तेवढ्यात म्हाळसामाता वाड्याच्या मागे वाहणाऱ्या शिवना नदीच्या पात्राकडे गेली. तिथे समवयस्क मित्रांसोबत खेळलेला जनुबाळ शांतपणे वाळूत बसला होता. दोन्ही हातांनी तो वाळू एकत्र करून भगवान शंकरांच्या पिंडीचा आकार तयार करीत होता. डोळे मिटून देवळातील महादेवाचे दर्शन स्मरणात आणत तो भक्तिभावाने वाळूचे शिवलिंग घडवीत होता. त्या कोवळ्या हातातून जणू भक्तीच मूर्त स्वरूप धारण करीत होती. भोवतालचा खेळ, मित्रांचा गोंधळ आणि नदीकाठची हालचाल यांचा त्याला विसर पडला होता.

          त्या क्षणी नदीकाठी वाहणारा मंद वारा, वाळूचा सुगंध आणि बालकाच्या मुखावरील एकाग्रता यांचे अद्भुत मिलन झाले होते. जणू निसर्गही त्या बालभक्ताच्या भक्तीचे साक्षीदार बनून शांत उभा होता. वाळूचे शिवलिंग सुंदर आकार घेत असतानाच मातेची हाक त्याच्या कानावर पडली. जनुबाळाने प्रथम त्या शिवलिंगाला नमस्कार केला, नंतर प्रसन्न वाहणाऱ्या शिवना नदीला वंदन केले आणि मग धावत मातेपाशी आला. त्याच्या अंगावर लागलेली माती म्हाळसामातेनं आपल्या साडीच्या पदराने प्रेमाने पुसली. ती हसत म्हणाली, बाळा, बघ घरात कोण आलं आहे. जनुबाळ निरागसपणे म्हणाला, कोण आलं गं बाई? स्वामीजी आईला प्रेमाने बाई म्हणत असत. म्हाळसामाता म्हणाली, अरे, देहगावचे तुझे आजोबा आले आहेत. जा, त्यांच्या पाया पड. भक्तीचा तो निरागस भाव पाहून असे वाटत होते की, या बालकाला देव शोधावा लागत नव्हता; देवत्वच त्याच्या अंतःकरणात जागृत होते.

          हे ऐकताच जनुबाळ अत्यंत नम्रतेने नारायण पाटलांच्या चरणी नतमस्तक झाला. त्या क्षणी वातावरणात एक विलक्षण पवित्र स्पंदन निर्माण झाले. जनुबाळाच्या नम्रतेत आणि तेजस्वी डोळ्यांत भविष्यातील महान संतत्वाची चाहूल स्पष्ट जाणवत होती. नारायण पाटील काही क्षण त्याच्याकडे एकटक पाहत राहिले. त्यांच्या अंतःकरणात वेगळीच भावना जागृत झाली हा साधा बालक नसून भविष्यात अनेकांच्या जीवनाला दिशा देणारा महात्मा आहे.

              त्यांच्या अंतर्मनात नकळत आदरभाव जागृत झाला. त्या तेजस्वी बालमुखाकडे पाहताना त्यांना क्षणभर काळाचा विसर पडला आणि मन भक्तिभावाने भरून आले. म्हाळसामातेलाही तो प्रसंग पाहून अश्रू अनावर झाले. तिच्या आयुष्यातील अनेक वर्षांची वेदना जणू त्या क्षणी हलकी झाली होती.

            पूर्वी देहगावच्या पाटील वाड्यात म्हाळसाची झालेली उपेक्षा आणि इतकी वर्षे न केलेली विचारपूस या आठवणी अजूनही ताज्या होत्या. तरीही काळ पुढे सरकत होता. अखेर म्हाळसा पुन्हा जनुबाळासह देहगावच्या पाटील वाड्यात पोहोचली. वाड्यातील काही लोकांच्या नजरा आजही तिरस्कारपूर्ण होत्या, काही जण कुजबुजत होते; पण या सर्वांपासून अनभिज्ञ असलेला जनुबाळ आपल्या निरागस स्वभावाने सर्वांचे मन जिंकत होता. तो मंदिरात शांत बसून ध्यान करी, वृद्धांना नम्रतेने वंदन करी आणि लहान मुलांशी प्रेमाने वागे. त्याच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला नकळत समाधान आणि शांतीची अनुभूती मिळत होती. गावातील काही ज्येष्ठ मंडळी म्हणू लागली हा बालक पुढे मोठा महात्मा होणार याच्यात ईश्वरी अंश स्पष्ट दिसतो.

             म्हाळसामाता अनेकदा जनुबाळाकडे पाहून हरवून जाई. मातृहृदयाला आता खात्री वाटू लागली होती की, हा बालक भविष्यात भक्तीचा दीप प्रज्वलित करणारा महान संत ठरणार आहे. बालवयातच जनुबाळाच्या कृतींमधून प्रकट होणारी भक्ती, नम्रता आणि ईश्वरनिष्ठा पाहून अनेकांच्या अंतःकरणात श्रद्धेचा अंकुर फुटू लागला होता. ज्यांच्या दर्शनाने मनाला शांती लाभे, ज्यांच्या स्पर्शाने श्रद्धा जागृत होई आणि ज्यांच्या वचनांतून भक्तीचा अमृतप्रवाह वाहू लागला, त्या दिव्य जीवनप्रवासाची ही केवळ प्रारंभिक चाहूल होती.

            भविष्यात हाच जनुबाळ भक्ती, साधना आणि अध्यात्माचा दिव्य मार्ग दाखवणारा “जनार्दन माऊली” म्हणून ओळखला जाणार होता. ईश्वराने मानवकल्याणासाठी पाठविलेल्या त्या दिव्य आत्म्याच्या बाललीला आता हळूहळू प्रकट होऊ लागल्या होत्या. काळाच्या ओघात या लीलाच पुढे असंख्य भक्तांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या ठरणार होत्या.

देहगावच्या पाटील वाड्यात सुरू झालेली ही बाललीला पुढे अनेक अद्भुत घटनांना जन्म देणारी ठरणार होती.

पुढील भाग क्रमशः 


संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवनचरित्र, दिव्य कार्य आणि अलौकिक लीलांचे सविस्तर दर्शन घेण्यासाठी भाग १ पासून संपूर्ण खालील लिंकला भेट द्या.

janardanmauli.blogspot.com


         जनार्दन माऊलींच्या श्रमयोग आणि सेवाभावाची प्रेरणा अधिकाधिक समाजापर्यंत पोहोचावी, यासाठी हा लेख आपल्या परिचितांपर्यंत अवश्य पोहोचवा.


#जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीमहाराज #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र #माऊली #चरित्र #janardan #janardanmauli #janardanswami #janardanswamimaharaj #janardanswamicharitra #santcharitra #mauli #charitra

सोमवार, २५ मे, २०२६

भाग -6 जनार्दन माऊलींच्या बाललीला संतत्वाचे प्रारंभिक दिव्य संकेत

 

भाग -६  
       
✍️🪔✨ जनार्दन माऊलींच्या बाललीला संतत्वाचे प्रारंभिक दिव्य संकेत  ✨🪔✍️
               
          प्रभू श्रीरामांच्या बाललीलांमध्ये जसे अलौकिक तेज, शांतता, निरागसता व दिव्यता अनुभवास येत असे, तसेच काहीसे विलक्षण भाव या बालकाच्या प्रत्येक हालचालीतून परिवार अनुभवत होता. प्रभू श्रीराम बालपणी सर्वांना आनंद, समाधान व प्रेमाची अनुभूती देत असत. त्यांच्या प्रत्येक बालक्रीडेमध्ये भविष्यातील मर्यादा पुरुषोत्तमत्वाचे संकेत दडलेले होते. त्याचप्रमाणे छोट्या “जनार्दना”च्या सहवासानेही संपूर्ण परिवार हरखून जात होता. सामान्य बालकांपेक्षा वेगळेपण दर्शविणाऱ्या त्याच्या प्रत्येक कृतीत भविष्यातील असामान्य संतत्वाची दिव्य झलक दडलेली जाणवत होती.
           बाळाच्या भविष्यवेधाची नारायण पाटलांनी दिलेली माहिती ऐकून म्हाळसा व मोहिते पाटील आनंदून गेले. बाळाचे जन्मनाव “नारायण” निघाले मात्र आजोबा नारायण पाटील यांनी बाळाचे नाव “जनार्दन” ठेवले हे ऐकून तर सर्वांच्या अंगावर आनंदाचे रोमांच आले. — “जनार्दना... जनार्दना...”
           म्हाळसाच्या नेत्रातून आनंदाश्रू गळू लागले. प्रसन्नवदन शांत “जनार्दनाला” दृष्ट लागू नये म्हणून माता म्हाळसाने आपल्या डोळ्यातील काजळ बोटाच्या टोकाने टिपून बाळाच्या गालावर लावले व अत्यानंदाने त्याला पदराखाली घेतले. भविष्यात ज्या स्वामीजींच्या नावाचा व सेवेचा आधार हा हजारो भक्तांना प्रेमाच्या पदराखाली घेऊन सुख देणारा ठरणार होता, तेच बाळ माता म्हाळसेच्या पदराखाली सुरक्षितपणे डोळे मिटून पहुडले होते.
             भूक लागली तरच किंचितशी कुणकुण करणारे बाळ एरव्ही अत्यंत शांत असायचे, जसे घरात आहे की नाहीच. सत्पुरुषांचे जीवन असेच असते. ते जनकल्याणासाठी जगात राहूनही जगात जाणीवेने नसतात. त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव हा केवळ सहवासानेच नव्हे तर स्मरणानेही लाभदायी ठरतो. संत समोर नसतील तरीही त्यांचे केवळ स्मरण सामान्यांना पुण्य प्रदान करते. माऊली ज्ञानेश्वरांच्या प्रार्थनेत सर्वजण म्हणतातच  तया आठविता महापुण्य राशी बस्स, त्यांची आठवणही जगाचा आधार असते.
            मोहित्यांची कन्या म्हाळसाने अशा बाळाला जन्म दिला होता की, सर्व परिवार त्याच्या मुखकमलाकडे पाहिल्याशिवाय कामधंद्याला जात नव्हता. जाता-येता एखादा तरी दृष्टीक्षेप “बाळाकडे” टाकल्याशिवाय मोहिते परिवाराचे पान हलत नव्हते. हातपाय हलवून व्यायाम व आनंद घेणाऱ्या बाळाने आता कूस बदलली. म्हाळसा त्याची ती चटकन “कूस” बदलण्याची अवस्था पाहून गालातल्या गालात हसत होती. भविष्यात असंख्य व्यक्तींच्या देहबुद्धीच्या विचारांची कूस बदलण्याची प्रेरणा देणारे व भगवद्भक्तीकडे त्यांना आकृष्ट करणारे स्वामीजी स्वतःच बाळलीलांमध्ये वारंवार कूस बदलत होते.
          अजून कुणाकडेही एकटक नजरेने न पाहणारे बालक सध्या कुठेतरी एकटक नजर लावीत असल्याचे म्हाळसा मातेने बघितले. तिने अनेकदा असे अनुभवले व नंतर त्याची शहानिशा उत्सुकतेने करू लागली. कुठेच नजर स्थिर न करणारे बाळ सध्या कशाकडे एकाग्रतेने बघते याचा शोध घेतला, त्यावेळी मातेला माहित झाले की देवघरावर लावलेल्या महादेवाच्या फोटोकडे बाळ टक लावून पाहत असते. जणू त्या कोवळ्या नेत्रांना पूर्वजन्मीची शिवभक्ती स्मरत होती. देवघरातील त्या शांत महादेवमूर्तीशी बाळाचे काही अदृश्य नाते असल्याचा अनुभव माता म्हाळसाला वारंवार येऊ लागला.
त्या निष्पाप नेत्रांतील एकाग्रता ही केवळ बालसुलभ कुतूहल नव्हती; ती जणू आत्म्याची आपल्या आराध्याशी होत असलेली निःशब्द भेट होती. शब्द नव्हते, विचार नव्हते, पण त्या दृष्टित भक्तीचा एक अदृश्य प्रवाह वाहत होता. माता म्हाळसा हे सर्व पाहत होती; मात्र त्या भावामागील गूढ तिलाही पूर्णपणे उलगडत नव्हते.
              जिज्ञासेपोटी व मौज म्हणून म्हाळसा मातेने महादेवाच्या फोटोकडे एकटक पाहणाऱ्या बाळाच्या डोळ्यासमोर साडीच्या पदराचा पडद्यासारखा अडथळा केला. मात्र फोटो दिसेनासा होताच बाळ लगेच अस्वस्थ होऊन कुणकुण करू लागले. मोठ्याने कधीच न रडणाऱ्या बाळाची ती केवळ कुणकुणही त्याच्या रडण्याचीच प्रक्रिया असते हे माता म्हाळसाला माहित होते. म्हणून बाळाची अस्वस्थता आणखी वाढू नये म्हणून आडोशासाठी घेतलेला पदर बाजूला केला. पूर्ववत महादेवाचा फोटो दिसू लागताच बाळ पुन्हा शांत झाले व त्या महादेवाच्या प्रतिमेकडे एकटक पाहू लागले. म्हाळसा मनातल्या मनात खुष होऊन हसत होती. संध्याकाळी भोजनसमयी बाळाच्या या कौतुकाची माहिती म्हाळसेने माता-पित्यांना दिली. भोजन करता करता सर्व परिवार त्या बाळलीलेने प्रमुदित झाला.
         बाळ रांगू लागले आता त्याच्यावर जास्त लक्ष देण्याची गरज होती. कारण संधी मिळाली की छोटा “जनू” रांगत रांगत देवघराकडे पळू लागायचा. देवघराकडे रांगत जाण्यात त्याला जास्त रंगत वाटायची. ज्या पावलांनी पुढे असंख्य भक्तांना ईश्वरमार्ग दाखवायचा होता, तीच छोटी पावले प्रथम देवघराच्या दिशेनेच वळत होती.
          सामान्य बालकांना खेळण्यांचे आकर्षण असते, परंतु या बालकाच्या पावलांना देवघराचे आकर्षण होते. जणू त्याच्या अंतःकरणात ईश्वरप्रेमाचा अंकुर जन्मताच फुलला होता. देवघराकडे रांगणारे ते बालरूप भविष्यात असंख्य जीवांना भक्तीमार्गावर चालण्याची प्रेरणा देणार होते.
         हे दृश्य परिवारासाठी अत्यंत आश्चर्यकारक व आनंददायी होते. मात्र व्यवस्थित मांडून ठेवलेल्या देवांच्या टाक-मूर्ती बाळाच्या खेळण्याने खालीवर होऊ नयेत तसेच देवघरात अखंड तेवत असणाऱ्या नंदादीपाचा बाळाला त्रास होऊ नये म्हणून सर्व परिवार दक्षता घेत असे.
            बाळासाठी घरात खेळणी, खुळखुळे येऊ लागले. परिवारातील सदस्य व नातलगांनी आणलेल्या नव्या खेळण्यांकडे बाळाचे लक्ष आकृष्ट व्हावे, बाळाने हसावे, त्या खेळण्या बाळमुठीत घेऊन खेळावे व ते आपण कौतुकाने पाहत बसावे अशी सर्वांची इच्छा असायची. परंतु बाळाला त्या खेळण्या व खुळखुळ्यांचे कोणतेही आकर्षण वाटत नव्हते. कुणी बळजबरीने त्याच्या बाळमुठीत एखादे खेळणे दिलेच तर तत्क्षणी ते खेळणे बाळ फेकून देत असे. संसारातील क्षणभंगुर आकर्षणांपासून अलिप्त राहण्याचा संदेश जणू त्या बालवयातच त्यांच्या वर्तनातून प्रकट होत होता. सृष्टीतील सर्वत्र पांगलेल्या नानाविध क्षणिक भोगवस्तूंकडे जे बालक जन्मताच प्रखर वैराग्य घेऊन आल्यामुळे आकृष्ट होणार नव्हते, ते या खुळखुळ्यांच्या व खेळण्यांच्या खेळात कसे रमू शकेल?
                या दैदिप्यमान बाळाच्या बाळलीलाही नेत्रदीपक होत्या. त्याकडे पाहणारे हरखून जायचे आणि स्वतःला विसरून जायचे. हीच खुण होती त्या बाळाच्या असामान्यत्वाची. बाळाचे बोबडे बोल व उच्चार मातेसह मोहिते परिवाराला जणू वेदमंत्रांचा आनंद देत होते. कधी “आई”, कधी “देव”, अशा मंजुळ स्वरातील उच्चार करणाऱ्या बाळाने जणू संकेतच दिला असावा की आयुष्यात आई आणि देव यांच्याखेरीज कुणाचाच लळा असणार नव्हता.
               मातेच्या दुधावर व त्यानंतर गोमातेच्या दुधावर वाढ होणाऱ्या बालकाचे आरोग्य निकोप होते. तरी वय वाढत असताना बाळाची वृत्ती व स्वभाव नवजात शिशूप्रमाणेच निरागस व निर्मळ राहिला. बालकाच्या बोबड्या उच्चारांची जागा आता सुस्पष्ट अक्षरांनी व अर्धवट तुटक वाक्यांनी घेतली होती. बाळाचे मामा पूजापाठ करीत बसले की, बाळाने त्यांच्या जवळ जाऊन बसावे, गंध लावून घ्यावा व ग्रंथ हातात घेऊन उगाचच पाने चाळीत बसावे. हे दृश्य अत्यंत मनोहारी होते. दिवसेंदिवस गंधाची, ग्रंथांची व पुस्तकांची बाळाची वाढती जिज्ञासा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरू लागली.
              ज्या हातांनी अजून अक्षरे ओळखली नव्हती, त्याच हातांना ग्रंथांचा स्पर्श प्रिय वाटत होता. ही केवळ बालक्रीडा नव्हती; ती भविष्यातील ज्ञानदीपाच्या प्रज्वलनाची पूर्वतयारी होती. जणू सरस्वतीमातेची कृपादृष्टी त्या बालरूपावर आधीपासूनच स्थिरावली होते अक्षरांचे ज्ञान नसतानाही ग्रंथांविषयी असलेली ओढ पाहून घरातील ज्येष्ठ मंडळींना आश्चर्य वाटायचे. भविष्यात ज्ञान, भक्ती आणि अध्यात्म यांचा दीप प्रज्वलित करणारे हेच बालक असल्याची जाणीव नकळत सर्वांच्या मनात उमटू लागली.
        परिवाराला त्या वेळी या सर्व घटनांचे पूर्ण महत्त्व कदाचित जाणवत नव्हते. परंतु काळाच्या ओघात प्रत्येक लहानशी लीला, प्रत्येक कृती आणि प्रत्येक संकेत हे एका महान संतजीवनाच्या सुवर्णपानांमध्ये परिवर्तित होणार होते. त्या बालकाच्या भोवती अदृश्यपणे विणली जात असलेली ही दिव्य कथा भविष्यात असंख्य भक्तांच्या श्रद्धेचा आधार बनणार होती.
              बालपणातील या साध्यासुध्या वाटणाऱ्या लीला प्रत्यक्षात एका महान संतचरित्राची प्रारंभिक चिन्हे होती. त्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक नजरेत आणि प्रत्येक निरागस कृतीत भविष्यातील लोककल्याणाचा दिव्य संकेत दडलेला होता. त्या बालरूपात भविष्यातील एक तेजस्वी अध्यात्मदीप शांतपणे प्रज्वलित होत होता.

॥ क्रमशः भाग पुढे ॥

संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवनचरित्र, दिव्य कार्य आणि अलौकिक लीलांचे सविस्तर दर्शन घेण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
janardanmauli.blogspot.com

         जनार्दन माऊलींच्या श्रमयोग आणि सेवाभावाची प्रेरणा अधिकाधिक समाजापर्यंत पोहोचावी, यासाठी हा लेख आपल्या परिचितांपर्यंत अवश्य पोहोचवा.

#जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीमहाराज #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र #माऊली #चरित्र #janardan #janardanmauli #janardanswami #janardanswamimaharaj #janardanswamicharitra #santcharitra #mauli #charitra

रविवार, २४ मे, २०२६

भाग -५ जन्मक्षणी प्रगटलेले अलौकिक दैवीय संकेत


✍️🌿‼️ जन्मक्षणी प्रगटलेले अलौकिक दिव्य दैवीय संकेत ‼️🌿✍️

         त्या काळातील ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि आपुलकी यांचे जणू सजीव चित्रच त्या दिवशी टापरगावात अनुभवास येत होते. एका बालकाच्या जन्माने संपूर्ण टापरगाव आनंदोत्सवात सहभागी झाले होते. मोहिते पाटील परिवाराचा आनंद गगनात मावेना.

            टापरगावात बातमी समजली. त्या त्या काळानुसार चालीरितीनुसार गावातील समस्त वतनदार, पाटील, जागल्यांनी (कोतवालांनी) आपआपली उपस्थिती दाखविली. मोहित्यांच्या दारावर मंगल तोरण बांधले. शिंग फुंकले. घंटानाद केला. सडा रांगोळी आणि सुवासिनींच्या हातातील मंगल कलश यांची लगबग झाली. वर्दळ वाढली. ग्रामस्थांनी मोहिते पाटील परिवाराचे अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली. घरी येणाऱ्या प्रत्येकाचे मुख मधुर करण्यासाठी साखरेने भरलेल्या पराती ठेवण्यात आल्या. शिंग फुंकले गेले. पुत्रोत्सवाचा आनंद साजरा झाला.

         वाड्याच्या अंगणात लहान बालकांचे खेळ, महिलांच्या मंगल गीतांचा स्वर आणि वडीलधाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून जणू देवताही आकाशातून हा सोहळा न्याहाळत असाव्यात असे वाटत होते.

       नवजात बालकाचे आजोबा अर्थात नारायणराव जयराम उगले पाटील हे पुराणांच्या व शास्त्रांच्या अभ्यासाने साक्षर व सदाचारी स्वभावाचे होते. समयसूचकता आणि धैर्याची मूर्तीच होते. पंचक्रोशितील प्रापंचिक भांडणे मिटविण्यात तसेच समाजातील संपत्तीच्या वाटणीतील तंटे सोडविण्यात तरबेज होते. त्यांनी दिलेला शब्द व निर्णय निमूटपणे सर्वांना मान्य असायचा. गावातील व परिसरातील लोकांच्या शास्त्रार्थाबाबतच्या शंकांचे समाधान करण्यासाठीच सतत पोथ्या, पुराणे, पंचांग उघडणारे नारायण पाटील आज आपल्या नातवाच्या जन्मासंबंधी माहिती घेण्यासाठी पंचांग घेऊन बसले. त्यांच्या वाणीमध्ये विलक्षण आत्मविश्वास होता. धर्म, न्याय आणि समाजसेवा या त्रिसूत्रीवर उभे असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व पंचक्रोशीत आदराचे केंद्र होते.

       पंचांगाची पाने चाळताना हाताची बोटे मोजत होते. कधी डोळे बंद करून कुठलासा अभिप्राय आठवत असावे तर कधी डोळे उघडे पण एकाग्र दृष्टीने पंचांगातील फलादेशाचे वाचन व चिंतन करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर कधी विस्मय, कधी हास्य, तर कधी गंभीर भाव वारंवार बदलत होते. घरातील परिवार सदस्य, पुरुष, महिला, मुले, मुली आजोबांच्या त्या अभ्यासपूर्ण हालचालींकडे लक्ष देऊन पाहत होते. सर्वांना जिज्ञासा होती की बाळ कसा निघेल? बाळाचे नाव काय निघेल?

             त्या क्षणी जणू काही अदृश्य दैवी संकेत त्यांच्या अंतःकरणात जागृत होत होते. पंचांगातील अक्षरे व ग्रहयोग यापलीकडे जाऊन काही विलक्षण अनुभूती त्यांच्या मनाला स्पर्श करीत होती. अनुभवी नजरेला दिसणारे ते संकेत सामान्यांना कदाचित जाणवत नसतील, परंतु नारायण पाटलांच्या अंतर्मनात मात्र त्या बालकाच्या भवितव्याचे तेजस्वी चित्र हळूहळू आकार घेत होते. घरातील प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढली होती. पंचांगातील प्रत्येक ओळ जणू त्या नवजात बालकाच्या भवितव्याचे गूढ उलगडत होती. सर्वांची उत्सुकता शिगेला जात असतानाच आजोबा नारायण पाटलांनी मोठ्याने टाळी वाजविली व आवाज दिला. अरे इकडे या, सर्वजण लवकर इकडे या. बघा, आपल्या कुळात एका अलौकिक बाळाचा जन्म झाला आहे. त्याचे जन्मनाव नारायण निघाले आहे. हे ऐकून सर्व विस्मयाने जवळ जमले. बालक मंडळी तर टाळ्या वाजवून नाचायला लागली.

         बालकांचा नाचण्याचा आनंद थोडा कमी होताच त्यांना शांत राहण्याची सूचना देऊन आजोबा नारायण पाटील उगले आपल्या परिवाराला व परिसरातील स्नेही, सोबती, नातेवाईकांना बाळाच्या जन्मासंबंधी स्थळ, काळ, ग्रहदशेची फलश्रुती सांगू लागले. महिला वर्ग तर जीवाचे भान व मनाचे कान करून ती फलश्रुती ऐकण्यासाठी उतावीळ झाला.

       वातावरणात एक विलक्षण पवित्रता भरून राहिली होती. अंगणातील गोंगाटही क्षणभर शांत झाल्यासारखा वाटत होता. उपस्थितांच्या मनात उत्सुकतेसोबतच एक अनामिक श्रद्धाभाव जागृत झाला होता. जणू काही परमेश्वराच्या योजनेतील एखादे गूढ रहस्य उलगडण्याची वेळ समीप आली होती. पुन्हा एकदा मोठ्याने हसून सर्वांकडे पाहून आजोबा सांगू लागले, "अरे बाबांनो व बायांनो, तुम्हाला काय सांगू रे, हा बाळ म्हणजे साक्षात देवाचाच अवतार असावा."

            आजोबांच्या मुखातून निघालेले ते शब्द ऐकताच उपस्थितांच्या मनात एकाच वेळी आश्चर्य, आनंद आणि कुतूहलाच्या भावना दाटून आल्या. "साक्षात देवाचाच अवतार असावा" हा उद्गार सहजपणे उच्चारला गेला नव्हता. त्यामागे पंचांगातील ग्रहस्थिती, जन्मवेळेचे योग आणि अनुभवी नजरेने जाणवलेले अनेक सूक्ष्म संकेत दडलेले होते. म्हणूनच त्यांच्या वाणीतील खात्री ऐकून उपस्थितांपैकी कोणीही त्या विधानाला विरोध केला नाही. उलट प्रत्येक जण त्या बालकाकडे नव्या दृष्टीने पाहू लागला.

           त्या काळी विज्ञानाची साधने किंवा आधुनिक भविष्यकथनाच्या पद्धती नसल्या तरी अनुभवी ज्येष्ठांच्या निरीक्षणशक्तीला समाजात मोठे स्थान होते. आयुष्यभर धर्मग्रंथ, पुराणे आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेल्या नारायण पाटलांच्या शब्दांना विशेष महत्त्व होते. त्यामुळे त्यांच्या मुखातून व्यक्त झालेला हा अभिप्राय उपस्थितांच्या मनात खोलवर कोरला गेला.

             त्यांच्या त्या शब्दांनी क्षणभर संपूर्ण वातावरण स्तब्ध झाले. उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. काही महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्या दिवशी केवळ एका बालकाचा जन्म झाला नव्हता, तर भविष्यात समाजाला दिशा देणाऱ्या एका तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे आगमन झाले होते.

       त्या दिवशी वाड्यात जमलेल्या लोकांना कदाचित भविष्यात काय घडणार आहे याची पूर्ण कल्पना नव्हती; परंतु वातावरणात जाणवणारी दैवी प्रसन्नता, सर्वांच्या मनात निर्माण झालेला अनामिक आनंद आणि आजोबांच्या वाणीतील दृढ विश्वास या सर्व गोष्टी काहीतरी विलक्षण घडल्याची साक्ष देत होत्या. काळाच्या ओघात अनेक घटना घडल्या, अनेक प्रसंग आले; परंतु त्या जन्मक्षणी उच्चारलेले शब्द लोकांच्या स्मरणातून कधीही पुसले गेले नाहीत.

            ज्या बालकाच्या आगमनाने संपूर्ण टापरगाव आनंदोत्सवात सहभागी झाले होते, त्याच बालकाच्या जीवनातून पुढे असंख्य जीवांना प्रेरणा, श्रद्धा आणि अध्यात्माची दिशा लाभणार होती. म्हणूनच त्या दिवसाचा आनंद हा केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नव्हता; तो भविष्यात समाजकल्याणासाठी प्रकट होणाऱ्या एका दिव्य शक्तीच्या आगमनाचा मंगल सोहळा होता.

पुढील भाग क्रमशः 


संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवनचरित्र, दिव्य कार्य आणि अलौकिक लीलांचे सविस्तर दर्शन घेण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

janardanmauli.blogspot.com


         जनार्दन माऊलींच्या श्रमयोग आणि सेवाभावाची प्रेरणा अधिकाधिक समाजापर्यंत पोहोचावी, यासाठी हा लेख आपल्या परिचितांपर्यंत अवश्य पोहोचवा.


#जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीमहाराज #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र #माऊली #चरित्र #janardan #janardanmauli #janardanswami #janardanswamimaharaj #janardanswamicharitra #santcharitra #mauli #charitra

शनिवार, २३ मे, २०२६

भाग - ४: दिव्य अवताराची पूर्वतयारी आणि जनार्दन माऊलींचा शुभजन्म


 भाग -४

      ✍️✨🌼 दिव्य अवताराची पूर्वतयारी आणि जनार्दन माऊलींचा शुभजन्म  🌼✨✍️

               निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत प. पू. सद्‌गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराजांच्या अवतरण अविष्काराच्या अर्थात जन्माच्या व्यवस्थेसाठी सृष्टीची अशीच पूर्वतयारी घडत होती. मोहिते पाटलांच्या माध्यमातुन पवित्र मातुलकुळ आणि पतिव्रता म्हाळसाच्या माध्यमातुन मातृत्व निश्चीत झालेले होते. बाळंतपणासाठी म्हाळसा दहेगावाहुन माहेरी टापरगावी निघाली. थोरामोठ्यांचे आशिर्वाद आणि ओटीभरण होताच ती गाडीत बसली. आनंदाने आणि औस्तुक्याने दहेगावच्या उगले पाटील परिवार व संबंधीतांनी तीला प्रेमाचा निरोप दिला.

            सगर्भाअवस्थेतील म्हाळसा दृष्ट लागावी अशी दिसत होती. टापरगावी माहेरच्या वाडयासमोर पोहोचताच माता शेवंताबाईंनी म्हाळसाच्या डोक्यावरून भाकरीचा तुकडा व लोटाभर पाणी ओवाळुन पलिकडे फेकले. जणु प्रवासात लागलेली दृष्ट उतरवुन फेकुन दिली. म्हाळसाला आता "सातवा" महिना लागला होता, तीच्या खाण्यापिण्याची व विश्रांतीची महिला वर्गाकडुन व मातेकडुन कटाक्षाने काळजी घेतली जात होती. माता व बालकाच्या निकोप वाढीसाठी हे ठिक होते. पण अजुनही काही व्यवस्था करावी लागते याचे भान बंधु बाबुराव मोहिते यांना असावे. बालकाच्या तनामनावर प्रकृतिस्वभावावर काही संस्कार व्हावे लागतात.

           म्हाळसाला समोर बसवुन तिचे बंधु बाबुराव भागवत ग्रंथाचे वाचन करू लागले. सगर्भा म्हाळसा बसल्या बसल्या सुस्ती यावी, अंमळ झोपेची डुलकी यावी अशा अवस्थेत होती. पण तरीही बाबुराव भागवत ग्रंथाचे वाचन मोठया आवाजात करीतच रहायचे. तो ग्रंथ म्हाळसाने ऐकलाच पाहिजे असा बाबुरावांचा तिला आग्रह देखील नव्हता. ते वाचन तीच्या पवित्र कुशीत प्रविष्ट असलेल्या एका महान शिवयोगी भगवद्भक्त अवतार पुरूषासाठी होते.

           या खेरीज वेळी प्रसंगी प्रवचने, किर्तन, सत्संग आणि भजनाच्या कार्यक्रमात म्हाळसाला बाबुराव जाणीवपुर्वक बसायला लावायचे.म्हाळसाला नववा महिना उलटुन गेला होता. दिव्य बालकाच्या जन्मासाठी पवित्र स्थळ, काळ, वेळ आणि शुभग्रहदशा जुळुन येत होती. जवळ येत होती.

                धन-धान्याने संपन्न धरणीमातेचा सौभाग्य अलंकार अशा दसरा, दिपावलीचा पवित्र आश्विन महिना. त्या वर्षाचे/ संवत्सराचे नाव होते आनंदनाम सवंत्सरे. शुक्ल पक्ष, गुरूवार, ललिता पंचमी, अनुराधा नक्षत्र, वाणिज करण, विष्कंभ योग, वृश्चिक रास, देवगण, नभोमंडळातील नवग्रहांपैकी बहुतांश ग्रहस्थिती अत्यंत शुभ, शके १८३६ वेळ सूर्योदयाची आणि दिनांक २४/०९/१९१४ अशा पवित्र शुभप्रसंगी महान शिवयोगी, त्यागी, तपस्वी संत निश्काम कर्मयोगी राष्ट्रसंत प. पू. सद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराजांचा जन्म झाला.

पुढील भाग क्रमश:

          संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवनचरित्र, दिव्य कार्य आणि अलौकिक लीलांचे सविस्तर दर्शन घेण्यासाठी खालील लिंकला अवश्य भेट द्या .

janardanmauli.blogspot.com

#जनार्दन #जनार्दनमाऊली #Janardan #JanardanMauli #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र #आध्यात्मिकता #भक्ती

शुक्रवार, २२ मे, २०२६

भाग - 3 जनार्दन माऊलींचे अवतार दिव्यत्व : संतजन्माची दैवी पूर्वतयारी

✨ जनार्दन माऊलींचे अवतार दिव्यत्व ✨

गृहस्थ जीवनाच्या दृष्टीने ती घटना व त्या क्षणाकडे कौतुकाने, वेगळेपणाने पाहण्याची उगले पाटलांना फारशी आवश्यकता वाटली नसावी. कारण काय? हे नित्याचेच असते. घडतच असते. नवअंकुराच्या नाविण्याकडे केवळ निसर्ग नियमाने पाहणाऱ्यास काय अप्रुप वाटणार?

मात्र हया नव निर्मितीच्या वृत्ताने मोहिते परिवारच नव्हे तर संपुर्ण टापरगाव प्रमुदीत झाले. दबलेल्या आवाजात चर्चा करून माहेरची मंडळी आनंदाच्या टाळया देउ लागले, घेवु लागले.

जनकल्याणाच्या व सुसंस्कृत समाज व्यवस्थेच्या संवर्धनाच्या सत्‌कार्यासाठी विश्वप्रकृतीने एखादया व्यक्तीस निवडले की ती व्यक्ती सृष्टीत विशेष वाटु लागते. म्हाळसा आता व्यक्ती नव्हे व्यक्तीविशेष ठरली होती. म्हाळसा आता वेगळ्या चैतन्याने भारावल्या सारखी दिसु लागली. तिच्या प्रत्येक वाक्यातुन, कार्यातुन आणि श्वासातुन दिव्यत्वाच्या स्पंदनांचे तेज जाणवु लागले.

देवापासुन दुरावलेल्या आणि अराजकतेने अशांत झालेल्या मानव समाजाच्या सुख - शांती प्राप्तीचा सामुदायिक आक्रंदनाचा आवाज देवापर्यंन्त पोहोचतो आणि मग दयाळु भगवंत संतरूपात अवतार घेतो. सृष्टी त्यासाठी उचित तयारी, भुमि-भुमिका तयार करते.

आता तीच तयारी सुरू झाली होती. म्हाळसा नावाच्या एका पतिव्रतेच्या पवित्र कुशीतुन जन्म घेण्यासाठी एक महान शिवयोगी उचित समयाची प्रतिक्षा करीत होते. सर्वसामान्य माणसांचा जन्म नैसर्गिक पध्दतीने व नैसर्गिक मार्गाने होतो.

अवतारी महापुरूषांचा जन्म देखील सकृतदर्शनी तसा वाटतो. मात्र भुमि आणि भुमिका यामध्ये सामान्यजन आणि संतजन यांच्या जन्म घटनेत महद् अंतर असते. ज्या पवित्र कुळात अशा संतांचा जन्म घडतो त्या कुळाची पुण्याई, परमार्थप्रवण जीवन प्रणाली, सदाचार आणि सात्विकता असावीच लागते.

"पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ॥"

इतर कामासाठी वापरायचे भांडे आणि दुध ठेवायचे भांडे यात फरक करतात. कारण दुध टिकावे म्हणुन त्या भांडयाच्या स्वच्छतेसाठी प्रकर्षाने लक्ष द्यावे लागते.

महापुरूषांच्या जन्मासाठी मातेची कुस किती पवित्र असावी लागते याचे दर्शन आज पर्यंतच्या संत चरित्रातुन त्यांना जन्म देणाऱ्या दिव्य मातृत्वाच्या माहितीतुन घडते. भगवद्भक्तीत ज्यांची अखंड मती असते अशाच मातृत्वास हे महद्भाग्य लाभु शकते. अन्यथा -

"नाही तरी काय थोडी । श्वान शुकरे बापुडी"

हेच दृष्य दिसते.

अवघड गणित सुटत नाही म्हणुन ते सोडविण्यासाठी विद्यार्थ्याने कितीही जागा बदलल्या तरी गणित सुटणे अवघडच होते. अर्थातच गणिताच्या साधनेसाठी भुमिचे वैशिष्टयाची मुळीच आवश्यकता नसते.

पुढील भाग क्रमशः

#जनार्दनमाऊली #जनार्दन #माऊलींचीअमृतवाणी #जनार्दनमाऊलींचीअमुतवाणी #janardanmauli #janardan #janardanswami #viral

गुरुवार, २१ मे, २०२६

भाग -२ जनार्दन माऊलींचे अवतार दिव्यत्व आणि संतस्वरूप


✍️✨⚜️ जनार्दन माऊलींचे अवतार दिव्यत्व आणि संतस्वरूप ⚜️✨✍️

             सामान्य जीव त्याच्या स्वतःच्या इच्छेने जन्म घेत नाही तर गत कर्माची फलनोन्मुख स्थिती म्हणजे प्रारब्ध भोगण्यासाठी त्याला जन्म घ्यावा लागतो. "दुःखासी कारण जन्म घ्यावा" या संतवचनाने हे सर्व सहज स्पष्ट होते.

              सामान्यांच्या बाबतीत कुठे जन्मावे, कुठे जावे, कुठे जगावे, कसे जगावे, व कसे आणि कुठे भरावे हे स्वतःच्या हातात नसते. प्रारब्धानुसार हे घडते. मानव प्रारब्धाने परतंत्र असतो. जेल मध्ये अर्थात कारावासात शिक्षा भोगणारा कैदी सर्वथैव जसा परतंत्र असतो. कारागृहात जाणे येणे तो ठरवित नाही. त्याचे ईच्छेप्रमाणे हे नसते. मात्र कारागृहाचा अधिक्षक नियंत्रक अधिकारी कारागृहात राहुनही कारागृहातील बंधनात बांधलेला नसतो. कारागृहात आत जाणे बाहेर पडणे यात तो स्वतंत्र असतो. त्याच अनुषंगाने पहाता सामान्यांचा जन्म प्रारब्ध भोगणेसाठी सिमीत जीवन जगतो, मात्र महापुरूष, संत हे स्वतंत्रवृत्तीने सृष्टीच्या कल्याणासाठी येथे स्वइच्छेने येतात. (जन्म घेतात), राहातात, कार्य करतात व आपल्या निजपदावर निजधामास सहज निघुन जातात.

            अवतार प्रणालीची अशीच खुण असते. म्हणुनच संत हे भगवंताचेच अवतार मानले जातात. "संत तेची देव - देव तेचि संत" अशी संतवचने आहेतच. सृष्टीत देवांचे अवतार हे शासन व्यवस्थेसारखे असतात. "विनाशायच दृष्कृताम" पदाचा भावार्थ तोच आहे. देव अवतार ही सृष्टीतील शासन व्यवस्था आहे. मात्र संतांचे अवतार हे सृष्टीतील "अनुशासन" व्यवस्था आहे.

              देव हे अवतार घेतांना हातात शस्त्र घेवुन येतात. जसे श्रीरामाचे धनुष्य हनुमंताची गदा, श्री शंकराचा त्रिशुळ, दुर्गाभगवतीची तलवार, श्रीकृष्णांचे सुदर्शन चक्र तात्पर्य, देव हे अवतार कार्य शस्त्राव्दारे क्रांती करतात. परिवर्तन करतात. मात्र संतांचे अवतार कार्य शस्त्राने नव्हे तर शास्त्राने घडते. आतापर्यंत झालेल्या अनेक संत अवतारांचे चरित्र पहावे. कोणत्याही संताच्या हातात कोणतेही शस्त्र नसल्याचे दिसुन येईल. देवांच्या विविध अवतार कार्यात अनेकानेक दुष्ट, दुर्जन राक्षसांचा वध केल्याचे स्पष्ट वर्णन ग्रंथात आहे. देव अवतारात प्रत्यक्षात त्या असुरांना कंठस्नानानेच संपविले.

             मात्र संतांनी त्या दुष्प्रवृत्तींच्या असुरी लोकांना शास्त्राव्दारे परिवर्तन करून त्यांचा उध्दार केला. प्रचंड पाप प्रवृत्तीने दरोडे घालणारा क्रूर कर्मा ज्याने अनेक निष्पाप माणसांचे बळी घेतले तोच दरोडेखोर ब्रम्हर्षी नारदांच्या सहवास सेवा अनुग्रहाने त्याच जन्मात वाल्मिक ऋषी म्हणुन प्रसिध्द झाले. अशा कितीतरी घटनांची प्रसंगांची नोंद पुराणात आहेच. संत जीवन चंदनवृक्षाप्रमाणे शितल सुगंधीत मौलिक असते. चंदनाचे संगतीत आसपास असणाऱ्या काटेरी वृक्ष, लतांनाही चंदनाचा सुगंध लागतो. चंदन घासला तरी सुगंध, जाळला तरी सुगंध, चंदन वृक्ष तोडतांना कुन्हाडीलाही सुगंधच मिळतो. असेच संतांचेही सामर्थ्य असते. सेवेने उध्दार होतोच, मात्र त्यांच्या विरोधात कार्य करणारेही शेवटी "संतत्वाला" पोहोचतात. साधु स्वभावाची, संतत्वाची स्पष्ट खुण आपल्या संत वाङमयात सर्व परिचीत आहेच ती म्हणजे -

॥ जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा । देव तेथेची जाणवा ॥

           संत हृदय हे दयाळु कृपावंत, प्रेमामृताने भरलेले असते. मानव जन्म घेवुन अज्ञानाने, कुसंगाने भ्रमिष्ट होवुन अनुचित कर्म करणाऱ्या व परिणामी पर्वतप्राय दुःखाने हीन दीन झालेले लोक पाहुन संत त्यांचे जवळ जाऊन त्यास कल्याण प्राप्तीची प्रेरणा आणि दिशा देतात.

"आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणाशी" ॥

           अशी स्वतःची स्पष्ट ओळख देवुनही प्रापंचीक बुध्दीने बांधलेले लोक त्यांना ओळखु शकत नाही.

पुढील भाग क्रमशः 

संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवनचरित्र, दिव्य कार्य आणि अलौकिक लीलांचे सविस्तर दर्शन घेण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

https://janardanmauli.blogspot.com

#जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीमहाराज #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र #माऊली #चरित्र #janardan #janardanmauli #janardanswami #janardanswamimaharaj #janardanswamicharitra #santcharitra #mauli #charitra

बुधवार, २० मे, २०२६

भाग १ 🚩🔱✨ जनार्दन माऊलींचे अवतार दिव्यत्व ✨🔱🚩


 भाग १

✍️🔱✨ जनार्दन माऊलींचे अवतार दिव्यत्व ✨🔱✍️

           सामान्य जीव या सृष्टीत जन्माला येतात, मात्र अवतार पुरुष अर्थात संतपुरुष ‘अवतार’ घेतात. अवतार म्हणजे वरतून खाली येणे. जणू आकाशाने मातीला मिठी मारणे म्हणजे अवतार आणि मातीने आकाशाला आलिंगन देण्यासाठी केलेला उत्थापन प्रयास म्हणजे साधना. हीच अध्यात्मिकता.

"परित्राणाय साधूनां विनाशय च दुष्कृताम । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥"

       भगवंताने श्रीमद्भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या माध्यमातून समस्त सुसंस्कृत समाजाला व भाविक भक्तांना आपल्या अवताराचे आश्वासन दिलेले आहे. साधुंच्या साधुवृत्तीच्या संरक्षणासाठी आणि दुष्कर्मींच्या विनाशासाठी युगानुयुगे मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो, अशी स्पष्ट कबुली श्रीकृष्ण भगवंतांनी दिलेली आहे. भगवंताचे असे अनेक अवतार पृथ्वीवर झाल्याची नोंद विविध धर्मग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये, वेद-उपनिषदांमध्ये आढळते. त्यात काही अंशावतार तर काही पूर्णावतार असे वर्णन आहे.

           कोणत्याही एका कार्यासाठी एकाच वेळी एक अवतार हा भगवंताचा अंशावतार मानतात. जसे हिरण्याक्षासाठी वराह अवतार, हिरण्यकश्यपूसाठी नृसिंह अवतार. मात्र श्रीराम अवतार व श्रीकृष्ण अवतार हे पूर्णावतार मानले जातात. ते सर्वांच्या कल्याणासाठी घेतलेले असतात. श्रीरामायण, श्रीमद्भागवत, महाभारत यांसारख्या ग्रंथांत या अवतारांच्या पूर्णत्वाच्या खुणा स्पष्ट वर्णिलेल्या आहेत. साधु-साधुवृत्तींच्या संरक्षणासाठी आणि दुष्प्रवृत्तींच्या विनाशासाठी भगवंत वेळोवेळी अवतार घेतात हे खरे आहे. मात्र जे सर्वसामान्य मानव आहेत ते शंभर टक्के दुष्प्रवृत्तीचेही नसतात आणि पूर्णपणे सद्गुणीही नसतात.

           उदाहरणच द्यायचे तर ते ना हिरण्यकश्यपु होऊ शकतात आणि ना प्रल्हाद होऊ शकतात. महिलांच्या बाबतीतही त्या ना शूर्पणखा होऊ शकतात आणि ना शबरी होऊ शकतात. मग अशा मध्यवृत्तीतील मानवांच्या उद्धारासाठी कोणती योजना? कोणता अवतार? भगवान सर्वांतर्यामी आहे, सर्वव्यापी आहे. मग त्या भगवंताने सामान्य मानवांच्या उद्धाराची योजना केली आहे का? या प्रश्नाचे उत्तर आहे — होय.

           विचारवंतांच्या मते, "देवाने माणूस झाल्याशिवाय माणसाला देवपण कळत नाही आणि देवपण कळले नाही तर माणूस देवप्राप्तीची इच्छा करत नाही." यासाठीच देव कधी पृथ्वीवर माणसाच्या रूपात प्रकट होतात. त्यांना आपण "देवमाणूस" म्हणतो. हेच अवतार पुरुष, हेच सत्पुरुष. संतांचा जन्म हाच अवतार मानला जातो.

           भगवंताचे पूर्णावतार किंवा अंशावतार हे विशिष्ट कार्यासाठी येतात, परंतु संत अवतार मानवाला मानवतेतून देवत्वाकडे नेण्यासाठी अवतरतात. ते चमत्कारांनी नव्हे तर प्रेमाने, उपदेशाने, आचरणाने आणि नामभक्तीने समाजाचे परिवर्तन करतात. संतांच्या सहवासात सामान्य माणसाला स्वतःचे दोष दिसू लागतात, सद्गुणांची ओढ निर्माण होते आणि ईश्वरप्राप्तीची तळमळ जागृत होते. संत म्हणजे चालते-बोलते शास्त्र, संत म्हणजे करुणेचा सागर, संत म्हणजे भगवंताच्या कृपेचे जिवंत स्वरूप. त्यामुळेच संतांचा जन्म हा केवळ एका व्यक्तीचा जन्म नसून असंख्य जीवांच्या कल्याणासाठी भगवंताने दिलेली दिव्य देणगी मानली जाते.

          "संत कृपा झाली, इमारत फळा आली" या संतवचनाप्रमाणे संतांचे आगमन म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीची नांदी असते. संत स्वतः मुक्त होऊन थांबत नाहीत, तर इतर जीवांनाही मुक्तीचा मार्ग दाखवतात. म्हणूनच संतांचे जीवन, त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य हे समाजासाठी प्रेरणेचे आणि कल्याणाचे अखंड स्रोत ठरतात. याच संतावतार परंपरेत अनेक थोर संतांनी भारतभूमीला पावन केले. त्यांनी आपल्या जीवनकार्याने असंख्य जीवांच्या अंतःकरणात भक्ती, श्रद्धा आणि सदाचाराची ज्योत प्रज्वलित केली. अशाच संतपरंपरेतील एक तेजस्वी, करुणामय आणि लोककल्याणासाठी अवतरलेले दिव्य व्यक्तिमत्त्व म्हणजे जनार्दन माऊली होय. त्यांच्या जीवनातील अवतारी खुणा, कार्य आणि दिव्यत्वाचा परिचय पुढील भागात पाहू क्रमशः

       जनार्दन स्वामींचे संपूर्ण जीवन चरित्र बघण्यासाठी पुढील लिंक जरूर ओपन करा व माऊलींचे संपूर्ण जीवन आत्मसात करा.

#janardan #जनार्दन #janardanMauli #जनार्दनमाऊली #चरित्र #जनार्दनस्वामीमहाराज #जनार्दनस्वामीचरित्र 

मंगळवार, १९ मे, २०२६

गंगा दशहरा आणि पुरुषोत्तम मास यांचा दिव्य योग

 गंगा दशहरा आणि पुरुषोत्तम मास यांचा दिव्य योग
गंगा दशहरा आणि पुरुषोत्तम मास हे दोन्ही पर्व सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. या दोन्हींचा एकत्र योग येणे भक्तांसाठी विशेष शुभ आणि पुण्यदायी मानले जाते. धर्मग्रंथांनुसार या काळात केलेले स्नान, दान, जप आणि भक्ती यांचे अनेक पटीने पुण्य प्राप्त होते.

ज्येष्ठ शुक्ल दशमीला माता गंगा पृथ्वीवर अवतरल्या अशी मान्यता आहे. राजा भगीरथ यांच्या तपश्चर्येमुळे गंगामाता स्वर्गातून पृथ्वीवर आल्या. भगवान शंकरांनी आपल्या जटांमध्ये गंगेला धारण करून पृथ्वीचे रक्षण केले. दहा प्रकारची पापे नष्ट होतात म्हणून या पर्वाला “दशहरा” असे म्हटले जाते.

स्कंद पुराण, पद्म पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण मध्ये गंगामातेचे महत्व आणि गंगास्नानाचे पुण्य सांगितले आहे. महाभारत मध्येही गंगेचा उल्लेख आढळतो.

पुरुषोत्तम मास हा भगवान श्रीविष्णूंना समर्पित पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात जप, व्रत, दान, सत्संग आणि नामस्मरण यांना विशेष महत्व असते. स्कंद पुराण, नारद पुराण, भागवत पुराण आणि भगवद्गीता मध्ये पुरुषोत्तम मासातील भक्ती आणि दानाचे महत्व सांगितले आहे.

गंगा दशहरा आणि पुरुषोत्तम मास एकत्र आल्याने शिवभक्ती आणि विष्णुभक्तीचा सुंदर संगम तयार होतो. या काळात गंगास्नान, हरिनाम जप, अन्नदान, तुळशी पूजन, गीता वाचन आणि सत्संग केल्याने मन शुद्ध होते व घरात सकारात्मकता वाढते असे मानले जाते.

गंगामातेची पवित्रता आणि पुरुषोत्तम मासातील भक्ती यांचा संगम म्हणजे आत्मशुद्धी, पुण्य आणि ईश्वरकृपेचा दिव्य योग होय.

॥ हर हर गंगे ॥ ॥ श्री हरि विष्णू ॥

सोमवार, १८ मे, २०२६

✨ अधिक मास महात्म्य ✨

🌼✨ अधिक मास महात्म्य ✨🌼 अधिक मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि ईश्वरभक्तीसाठी श्रेष्ठ मानला जाणारा महिना आहे. या महिन्याला “पुरुषोत्तम मास” असेही संबोधले जाते. भगवान श्रीविष्णू यांनी स्वतःचे “पुरुषोत्तम” हे नाव या महिन्यास दिल्यामुळे या मासाचे महत्त्व अनन्यसाधारण झाले. हा महिना मनुष्याच्या आत्मशुद्धीसाठी, अंतर्मुख साधनेसाठी आणि सत्कर्मासाठी परमश्रेष्ठ मानला जातो. हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीनुसार चालते, तर सौर वर्ष सूर्याच्या भ्रमणावर आधारित असते. चंद्र वर्ष आणि सौर वर्ष यामध्ये दरवर्षी काही दिवसांचे अंतर निर्माण होते. हे अंतर वाढत वाढत जेव्हा मोठे होते, तेव्हा त्या संतुलनासाठी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हाच अतिरिक्त महिना म्हणजे अधिक मास होय. पूर्वी या महिन्याला कोणतेही विशेष स्थान नव्हते. शुभकार्ये या महिन्यात केली जात नसल्यामुळे लोक त्याचा तिरस्कार करीत. त्यामुळे दुःखी झालेला हा मास भगवान विष्णूंच्या चरणी गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला आपल्या नावाने गौरविले आणि सांगितले की, “जो भक्त या महिन्यात भक्ती, जप, तप, दान आणि सत्कर्म करील त्याला अनेक जन्मांचे पुण्य प्राप्त होईल.” तेव्हापासून हा मास पुरुषोत्तम मास म्हणून पूजनीय ठरला. स्कंद पुराण, पद्म पुराण आणि इतर अनेक धर्मग्रंथांमध्ये अधिक मासाचे मोठे महात्म्य वर्णन केले आहे. या महिन्यात केलेले जप, दान, व्रत, उपवास आणि साधना अनेक पटींनी फळ देते असे सांगितले जाते. त्यामुळे हा महिना केवळ कालगणनेतील अतिरिक्त महिना नसून आत्मिक उन्नतीची दिव्य संधी मानला जातो. या पवित्र काळात भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि सद्गुरूंचे स्मरण करण्यास विशेष महत्त्व आहे. विशेषतः “श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज” यांच्या नामाचा जप केल्याने मनाला शांतता, स्थैर्य आणि भक्तीची अनुभूती प्राप्त होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. अधिक मासात नामस्मरणाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. जसे हरिनाम मनुष्याला पापातून मुक्त करते, तसेच सद्गुरूंचे नाम मनुष्याला योग्य मार्ग दाखवते. भगवान विष्णूंना “जनार्दन” या नावानेही संबोधले जाते. “जन” म्हणजे लोक आणि “अर्दन” म्हणजे दुःख दूर करणारा. म्हणजेच जनार्दन म्हणजे भक्तांचे दुःख दूर करणारा परमेश्वर. त्यामुळे “ॐ जनार्दनाय नमः” हा मंत्र भगवान विष्णूंच्याच दिव्य स्वरूपाला वंदन करणारा मानला जातो. सद्गुरूंच्या कृपेने आणि भगवान विष्णूंच्या स्मरणाने हा मंत्र भक्ताच्या जीवनात शांती, समाधान आणि आध्यात्मिक बळ निर्माण करतो. म्हणूनच अधिक मासात “ॐ जनार्दनाय नमः” या मंत्राचा श्रद्धेने जप करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. या मंत्राच्या जपामुळे मन शुद्ध होते, विचार पवित्र होतात आणि भक्तीमार्ग अधिक दृढ होतो. या महिन्यात सात्त्विक जीवन जगण्यास विशेष महत्त्व आहे. पहाटे स्नान करून देवपूजा करणे, भगवद्गीता, रामायण, भागवत यांचे वाचन करणे, भजन-कीर्तन ऐकणे, अन्नदान करणे, गरजूंना मदत करणे आणि मन, वाणी व आचरण शुद्ध ठेवणे हे अधिक मासाचे खरे पालन मानले जाते. या काळात संयम, दया, क्षमा आणि भक्ती या गुणांची जोपासना केली तर मनुष्याचे जीवन अधिक पवित्र बनते. अधिक मासात सांसारिक शुभकार्ये जसे विवाह, गृहप्रवेश, वास्तुशांती, मुंज किंवा नवीन मोठ्या कामांची सुरुवात परंपरेनुसार टाळली जाते. यामागील भाव असा आहे की हा काळ बाह्य ऐश्वर्याचा नसून अंतर्मुख साधनेचा आहे. मनुष्याने या काळात ईश्वराशी आणि सद्गुरूंशी आपले नाते दृढ करावे, स्वतःच्या जीवनाचा विचार करावा आणि धर्ममार्गाकडे वळावे हा यामागील मुख्य उद्देश आहे. अधिक मास मनुष्याला शिकवतो की जीवनात धनापेक्षा धर्म मोठा आहे, अहंकारापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे आणि संसाराच्या धावपळीपेक्षा ईश्वरनाम अधिक शांतिदायी आहे. म्हणूनच या पवित्र महिन्यात ईश्वरभक्तीबरोबर सद्गुरूंच्या चरणी श्रद्धा ठेवून “ॐ जनार्दनाय नमः” या मंत्राचा जप करणे हे आत्मिक उन्नतीचे प्रभावी साधन ठरते. ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ #जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनमाऊलींचीअमुतवाणी #माऊलींचीअमृतवाणी #janardanswami #janardanmauli #अधिकमास

श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी जी महाराज गुरु महिमा

✨🌼 श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचा गुरु महिमा 🌼✨
          गुरु म्हणजे केवळ एक व्यक्ती नसून, तो जीवनाला योग्य दिशा देणारा दिव्य प्रकाश असतो. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा जो मार्गदर्शक असतो, त्यालाच “गुरु” म्हणतात. संत परंपरेत गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. कारण देवाची ओळख करून देणारे सद्गुरु म्हणजेच श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज होय.
            “गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा”
या ओळींतून गुरुचे महान स्वरूप स्पष्ट होते. जनार्दन माऊलींनी आपल्या भक्तांच्या जीवनात श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा दिवा प्रज्वलित केला. त्यांच्या कृपेने अनेकांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली.
              श्री जनार्दन माऊली हे ज्ञान, साधना आणि भक्तीचे सजीव रूप होते. त्यांच्या प्रत्येक उपदेशातून मानवतेचा संदेश मिळतो. त्यांनी समाजात धर्म, संस्कार आणि सदाचार यांचे महत्त्व रुजविले. भक्तांच्या दुःखात धावून जाणारे आणि सर्वांना प्रेमाने आपलेसे करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
“गुरु हा ज्ञानाचा साजा, गुरु हा माझा देवदत्ता”
ही भावना प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणात जनार्दन माऊलींविषयी कायम असते. कारण त्यांच्या चरणी असलेली भक्ती मनाला शांती आणि जीवनाला समाधान देते.
        श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे जीवन हे भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्या आशीर्वादाने भक्ती, सेवा आणि सत्याचा मार्ग अधिक दृढ होतो. गुरु कृपा हीच जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे, आणि त्या कृपेचा अनुभव जनार्दन माऊलींचे भक्त आजही घेत आहेत.

#जनार्दन #जनार्दनमाऊली #माऊलींचीअमृतवाणी #जनार्दनमाऊलींचीअमुतवाणी #janardanmauli #अधिकमास #रमेशगिरीजीमहाराज #janardanswami #janardan 

गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज यांची जीवनगाथा

 सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज – जीवन गाथा  वैयक्तिक परिचय व जीवनप्रवास  एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते लाखो भाविकांचे श्रद्...