शुक्रवार, २९ मे, २०२६

भाग -१० अंधाराच्या रात्रीतून सुरू झालेला दिव्य प्रवास


 भाग -१०

     ⚜️✍️☘️अंधाराच्या रात्रीतून सुरू झालेला दिव्य प्रवास☘️✍️⚜️

त्या रात्रीचा अंधार फक्त दहेगावावर उतरला नव्हता, तर तो माणुसकीच्या अंतःकरणावर उतरला होता. एका निष्पाप जीवाचे डोळे फोडून त्याचे आयुष्य कायमचे अंधारात ढकलण्याची योजना आखली जात होती. “डोळे फुटले की हा जनार्दन आपल्या हातात येईल, आपल्या आज्ञेत येईल, आपल्या अंकित होईल, आपल्याच आधाराने जगेल, आपण देऊ त्या उष्टया खरखटया अन्नावर दीनहीन होवुन जगेल,” या आसुरी आनंदाच्या कल्पनेने बाजीराव पाटील मनातल्या मनात नाचु लागला. मानवाच्या क्रौर्यापेक्षा देवाची करुणा मोठी असते, याचाच तो काळ होता.

त्याच ब्राम्हण मावशीच्या वाणीतुन देव बोलला. जनार्दनांना प्रेरणा मिळाली. माहिती मिळाली. कारण त्या कुलकर्णी मावशीचे पती त्याच दहेगावात तलाठी होते. तलाठ्याचे दोन डोळे म्हणजे कोतवाल व जागल्या. गावातील इत्यंभूत माहिती गोळा करणारे हे दोन सेवक सतत स्वामीनिष्ठ असायचे. त्यांना ही कुणकुण लागली. कोतवालाची पत्नी आडोशाचा आधार घेवुन ब्राम्हण मावशीला भेटली. तिच्या डोळयात दुःखाश्रु मावत नव्हते. मुखातुन शब्द उमटत नव्हते.

“काय झाल बाई? का रडते?” ब्राम्हण मावशीच्या प्रश्नांनी भानावर आलेल्या कोतवालाच्या पत्नीने रडत रडत सांगितले, “मावशी, संपले सगळे… घात झाला… जनार्दनाच्या जीवनातील उजेड कायमचा संपविण्यासाठी रात्रीच्या अंधारात अग्नित लोखंडी सळया तापत आहेत. काही तरी करा मावशी… तुम्ही काही तरी करा… तुमच्या पाया पडते…” डोळयातील पाणी पदराने पुसत पुसत ती कुणाला कळायच्या आत अंधाराचा फायदा घेवुन स्वतःच्या घरी पोहोचली. तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे फक्त दुःखाचे नव्हते; ते मानवतेचे शेवटचे थेंब होते. अन्यायाच्या सावलीतही काही अंतःकरणे देवाच्या प्रेरणेने जागी असतात, हे तिच्या कृतीतून दिसून आले.

द्रव्य लोभाने व पाटलांच्या भयाने तो चांडाळ हे क्रूरकर्म करण्यास तयार झाला होता. पेटलेल्या प्रज्वलीत अग्नित दोन टोकदार सळया तापत घातल्या होत्या. त्या आधी त्याने दोन बाटल्या मद्य स्वतःच्या पोटात घातले होते. क्रूरकर्म करतांना अतिरिक्त उन्मादाची आवश्यकता असते. ती दारू प्राशनाने मिळते, ही गोष्ट चांडाळ जाणत होता. मद्याच्या नशेत तो तेथेच चाळवा चाळव करीत होता. हाताच्या मुठीत कपडा घेवुन टोकदार लोखंडी सळया तापतांना कमी राहु नये म्हणुन त्या वर खाली करून चाळवीत होता.

त्या धगधगत्या सळया जशा अग्नीत तापत होत्या, तसतसे जनार्दनांचे जीवनही तप्त होत होते. पण सोने जसे अग्नीतून अधिक तेजस्वी बनते, तसेच संकटांच्या ज्वाळांमधून स्वामीजींचे व्यक्तिमत्त्व अधिक दिव्य होत गेले. त्यांच्या शरीराला जखमा देण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांच्या आत्मतेजाला कुणीही स्पर्श करू शकले नाही.

ब्राम्हण मावशी कडुन मिळालेल्या माहितीवरून मागच्या दाराची कडी तोडुन जनार्दन गुप्त रस्त्याने पळत होते. सर्वाव्यापी शिव त्यांना शक्ती देवुन वेगाने चालवित असावे. मागच्या दाराची तुटलेली कडी ही केवळ लाकडाची नव्हती, तर ती संकटाच्या कैदेतून मुक्त होणाऱ्या जीवनाची सीमा होती. प्रत्येक पाऊल जणू महादेवांच्या कृपेने पुढे पडत होते. काळोख दाटला होता, पण त्यांच्या अंतरात्म्यातील दिवा अजूनही प्रज्वलित होता.

चांडाळाची चाळवा चाळव संपली. सळया पुर्ण तापल्या होत्या, पण स्वामीजींचा चालण्याचा वेग वाढला होता. रिकामी खोली. सर्वच वाया गेले. चांडाळ थरकला, आणि ते कळताच बाजीराव पाटलांचा क्रोधाने थरकाप वाढला. अशा कितीतरी जीवघेण्या घटना वारंवार घडत होत्या. पाटील बंधु बिघडत होते. स्वामीजींचे जीवन तेजोवलयाने वाढत होते, घडत होते.

आता दहेगावी राहणेचे कारण काय? अशा प्रश्नांची उकल करता करता स्वामीजींनी घर, गाव सोडले. दहेगाव सोडुन इतरत्र कोठेतरी निघुन जायचे ठरले. कोठे जायचे हे ठरले नव्हते, कसे जायचे हे ठरले नव्हते, मात्र कशासाठी जायचे हे ठरले असावे. त्याही वेळी शरिरधारण करणेसाठी निवासाची व अन्न-पाण्याच्या आधाराची किंचितशी आवश्यकता होती असे दाखवुन घराबाहेर पडले.

दहेगाव सोडताना जनार्दनांच्या मनात राग नव्हता, सूड नव्हता; फक्त एक विरक्त वेदना होती. ज्या मातीत बालपण रुजले, ज्या रस्त्यांवर पाय वाढले, त्याच भूमीतून एका साधकाला रात्रीच्या अंधारात निघून जावे लागले. पण कधी कधी ईश्वर महान कार्यासाठी आपल्या भक्ताला जन्मभूमीपासून दूर नेत असतो. कारण काही जीव गावासाठी जन्माला येत नाहीत, ते संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी घडविले जातात.

त्या रात्री जनार्दन फक्त दहेगाव सोडून गेले नाहीत, तर संसाराच्या मोहातून बाहेर पडून नियतीच्या नव्या प्रवासाला निघाले. मागे राहिला तो अन्याय, क्रौर्य आणि भीतीचा इतिहास; पुढे सुरू झाला तप, त्याग आणि लोककल्याणाचा दिव्य मार्ग.

 पुढील भाग क्रमशः

#जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनमाऊलींचेचरित्र #चरित्र #जनार्दनस्वामी #जनार्दनस्वामीचेचरित्र

1 टिप्पणी:

गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज यांची जीवनगाथा

 सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज – जीवन गाथा  वैयक्तिक परिचय व जीवनप्रवास  एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते लाखो भाविकांचे श्रद्...