भाग-११
✍️⚜️✨ जनार्दनाचा अवतार श्रमातून परमार्थाकडे ✨⚜️✍️
इ. स. १९२८… रात्र आपली काळी शाल पांघरून गावावर विसावली होती. त्या काळोखाच्या कुशीतून एक तेजस्वी पण सामान्य वेशातील पुरुष करंजगावच्या वेशीवर पोहोचला. पायाला भिंगरी, मनाला ध्येय आणि चेहऱ्यावर अपरंपार शांती. रात्र मारुती मंदिराच्या थंड पायरीवर काढली. पहाट होताच नित्य स्नान, पूजा आटोपून ते चालत गेले करंजगावचे धनाढ्य शेतकरी आणि व्यापारी खुशालशेठ-माणिकशेठ यांच्या भल्या मोठ्या वाड्याकडे.
दुकानाच्या ओट्यावर उभ्या असलेल्या त्या तरुणाकडे पाहून शेठजींना वाटलं, “किराण्यासाठी आला असावा.” त्यांनी सहज विचारलं, “काय हवंय बाळा?”
त्या तरुणाच्या डोळ्यात मागण्याचा लोभ नव्हता, याचना नव्हती. होता तो फक्त सेवेचा भाव. नम्रपणे पण ठामपणे तो म्हणाला, “काम हवंय.”
“काय काम करशील?”
“आपण सांगाल ते.”
“मजुरी किती घेशील?”
“आपण आनंदाने जेवढी द्याल, तेवढीच. जशी द्याल तशी स्वीकारीन.”
हा नुसता नोकरी मागणारा मुलगा नव्हता. हा होता तोच अवतारी पुरुष, जो भविष्यात लाखोंना अन्नदान करणार होता, पण आज तो स्वतः मजुरी मागत होता. कशासाठी? पोटासाठी नव्हे. तर अख्ख्या समाजाला “श्रमयोग” शिकवण्यासाठी.
श्रीकृष्णांनी गीतेत अर्जुनाला आणि त्यानिमित्ताने अख्ख्या मानवजातीला सांगितलं – “हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे.” या शरीररूपी शेतात जर भक्तीच्या बीजातून परिश्रमाचं पाणी घातलं, तर परमानंदाचं पीक येतं. हाच मानवजन्माचा खरा सार्थकता.
पण आपण काय करतो? “साधासे करिसी प्रपंच दिननिशी, हरीसी न भजसी कवण्या गुणे” – हरिपाठाची ही टोचणी आपल्या काळजात रुतत नाही.
जगद्गुरू तुकाराम कळवळून विचारतात – “किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित?”
पण आपण सुखाच्या भासात एवढे गुरफटून गेलो आहोत की जन्म-मरणाच्या दुःखाची जाणीवच हरवली आहे.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “उपजे ते नाशे, ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिश्रमे गा.”
हा संसार म्हणजे फिरणारं यंत्र आहे. यात जन्म-मरणाची चक्रं अव्याहत चालतात. पण सुखाचा भास सत्य वाटतो आणि आपण त्यात अडकतो.
म्हणूनच संतांना कळवळा आला. खुशालशेठसारख्या मोठ्या माणसाला आधी शहाणं करावं, मग आपोआप गाव शहाणं होईल – हा विचार करूनच स्वामीजींनी खुशालशेठच्या शेतात “जनार्दन” बनून कामाला सुरुवात केली.
सामान्य माणसाच्या मनात जर स्वास्थ्य नसेल, तर तो कुठलंच काम मनापासून करू शकत नाही. तन एकीकडे, मन दुसरीकडे – मग आळस येतो, प्रमाद होतो, आणि शेवटी पदरात पडते ती निराशा. लाभाऐवजी हानी, आनंदाऐवजी समस्या.
परिश्रमाशिवाय श्रीमंतीची दिवास्वप्नं पाहणाऱ्याचं मन काळवंडून जातं. बुद्धी भ्रष्ट होते. निर्णयशक्ती नष्ट होते. आणि मग आयुष्यात पावलोपावली अपघात आणि आपदा येतात.
म्हणूनच आपल्या ऋषींनी “कर्मयोग” दिला. ईश्वराला अर्पण करून केलेलं कर्म म्हणजे यज्ञ. आणि गीता स्पष्ट सांगते – “योगः कर्मसु कौशल्यम्.” कर्मातलं कौशल्य हाच खरा योग.
महाराष्ट्राच्या मातीतले संत हेच जगून गेले. संत शिरोमणी सावता महाराजांचा मळा, संत गोरोबा काकांची माठाची निर्मिती, संत सजन कसायाचा मास विक्रीचा व्यवसाय, संत सेना महाराजांचा नाभिक व्यवसाय, संत चोखोबांची मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची कामे, संत कबीरांचं विणकाम, संत नामदेवांचं शिवणकाम, संत नरहरीचं सोनारकाम – या कुठल्याच कामाला भक्तीने “हलकं” मानलं नाही. कारण त्यांनी समजून घेतलं – *“सहयज्ञः प्रजा सृष्ट्वा”* – एकमेकांच्या श्रमातूनच समाज टिकतो.
आपण एक चूक करतो – मालक समोर नाही की काम चोरतो. पण विसरतो, की जगाचा मालक विश्वनाथ तर सर्वत्र आहे, सर्व पाहतोय. त्याला कसं फसवणार?
म्हणूनच घरची श्रीमंती मागे ठेवून स्वामीजी “जनार्दन” बनून करंजगावच्या मातीत राबत होते. कारण संत म्हणजे आधी करून दाखवणारा. “आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताव्या” – हेच त्यांचं ब्रीदवाक्य.
परिश्रमात कंटाळा येणं स्वाभाविक आहे. पण स्वाभाविक बदल हा प्रमाद नाही. हाताला बोजा वाटतो, पण हाताचा नाही. डोक्याला गाठोडं जड वाटतं, पण डोक्याचा नाही. कारण जे आपलं आहे, जे स्वाभाविक आहे, त्याचा बोजा कधीच वाटत नाही.
माऊलींचं वचन हेच शिकवतं – की
“तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्म कुसुमांची वीरा” ॥
पुढील भाग क्रमश:
संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवनचरित्र, दिव्य कार्य आणि अलौकिक लीलांचे सविस्तर दर्शन घेण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
janardanmauli.blogspot.com
#जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र #आध्यात्मिकता #जनार्दनस्वामीमहाराज #janardan #janardanmauli #janardanswamicharitra #janardanswami

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा