सोमवार, २५ मे, २०२६

भाग -6 जनार्दन माऊलींच्या बाललीला संतत्वाचे प्रारंभिक दिव्य संकेत

 

भाग -६  
       
✍️🪔✨ जनार्दन माऊलींच्या बाललीला संतत्वाचे प्रारंभिक दिव्य संकेत  ✨🪔✍️
               
          प्रभू श्रीरामांच्या बाललीलांमध्ये जसे अलौकिक तेज, शांतता, निरागसता व दिव्यता अनुभवास येत असे, तसेच काहीसे विलक्षण भाव या बालकाच्या प्रत्येक हालचालीतून परिवार अनुभवत होता. प्रभू श्रीराम बालपणी सर्वांना आनंद, समाधान व प्रेमाची अनुभूती देत असत. त्यांच्या प्रत्येक बालक्रीडेमध्ये भविष्यातील मर्यादा पुरुषोत्तमत्वाचे संकेत दडलेले होते. त्याचप्रमाणे छोट्या “जनार्दना”च्या सहवासानेही संपूर्ण परिवार हरखून जात होता. सामान्य बालकांपेक्षा वेगळेपण दर्शविणाऱ्या त्याच्या प्रत्येक कृतीत भविष्यातील असामान्य संतत्वाची दिव्य झलक दडलेली जाणवत होती.
           बाळाच्या भविष्यवेधाची नारायण पाटलांनी दिलेली माहिती ऐकून म्हाळसा व मोहिते पाटील आनंदून गेले. बाळाचे जन्मनाव “नारायण” निघाले मात्र आजोबा नारायण पाटील यांनी बाळाचे नाव “जनार्दन” ठेवले हे ऐकून तर सर्वांच्या अंगावर आनंदाचे रोमांच आले. — “जनार्दना... जनार्दना...”
           म्हाळसाच्या नेत्रातून आनंदाश्रू गळू लागले. प्रसन्नवदन शांत “जनार्दनाला” दृष्ट लागू नये म्हणून माता म्हाळसाने आपल्या डोळ्यातील काजळ बोटाच्या टोकाने टिपून बाळाच्या गालावर लावले व अत्यानंदाने त्याला पदराखाली घेतले. भविष्यात ज्या स्वामीजींच्या नावाचा व सेवेचा आधार हा हजारो भक्तांना प्रेमाच्या पदराखाली घेऊन सुख देणारा ठरणार होता, तेच बाळ माता म्हाळसेच्या पदराखाली सुरक्षितपणे डोळे मिटून पहुडले होते.
             भूक लागली तरच किंचितशी कुणकुण करणारे बाळ एरव्ही अत्यंत शांत असायचे, जसे घरात आहे की नाहीच. सत्पुरुषांचे जीवन असेच असते. ते जनकल्याणासाठी जगात राहूनही जगात जाणीवेने नसतात. त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव हा केवळ सहवासानेच नव्हे तर स्मरणानेही लाभदायी ठरतो. संत समोर नसतील तरीही त्यांचे केवळ स्मरण सामान्यांना पुण्य प्रदान करते. माऊली ज्ञानेश्वरांच्या प्रार्थनेत सर्वजण म्हणतातच  तया आठविता महापुण्य राशी बस्स, त्यांची आठवणही जगाचा आधार असते.
            मोहित्यांची कन्या म्हाळसाने अशा बाळाला जन्म दिला होता की, सर्व परिवार त्याच्या मुखकमलाकडे पाहिल्याशिवाय कामधंद्याला जात नव्हता. जाता-येता एखादा तरी दृष्टीक्षेप “बाळाकडे” टाकल्याशिवाय मोहिते परिवाराचे पान हलत नव्हते. हातपाय हलवून व्यायाम व आनंद घेणाऱ्या बाळाने आता कूस बदलली. म्हाळसा त्याची ती चटकन “कूस” बदलण्याची अवस्था पाहून गालातल्या गालात हसत होती. भविष्यात असंख्य व्यक्तींच्या देहबुद्धीच्या विचारांची कूस बदलण्याची प्रेरणा देणारे व भगवद्भक्तीकडे त्यांना आकृष्ट करणारे स्वामीजी स्वतःच बाळलीलांमध्ये वारंवार कूस बदलत होते.
          अजून कुणाकडेही एकटक नजरेने न पाहणारे बालक सध्या कुठेतरी एकटक नजर लावीत असल्याचे म्हाळसा मातेने बघितले. तिने अनेकदा असे अनुभवले व नंतर त्याची शहानिशा उत्सुकतेने करू लागली. कुठेच नजर स्थिर न करणारे बाळ सध्या कशाकडे एकाग्रतेने बघते याचा शोध घेतला, त्यावेळी मातेला माहित झाले की देवघरावर लावलेल्या महादेवाच्या फोटोकडे बाळ टक लावून पाहत असते. जणू त्या कोवळ्या नेत्रांना पूर्वजन्मीची शिवभक्ती स्मरत होती. देवघरातील त्या शांत महादेवमूर्तीशी बाळाचे काही अदृश्य नाते असल्याचा अनुभव माता म्हाळसाला वारंवार येऊ लागला.
त्या निष्पाप नेत्रांतील एकाग्रता ही केवळ बालसुलभ कुतूहल नव्हती; ती जणू आत्म्याची आपल्या आराध्याशी होत असलेली निःशब्द भेट होती. शब्द नव्हते, विचार नव्हते, पण त्या दृष्टित भक्तीचा एक अदृश्य प्रवाह वाहत होता. माता म्हाळसा हे सर्व पाहत होती; मात्र त्या भावामागील गूढ तिलाही पूर्णपणे उलगडत नव्हते.
              जिज्ञासेपोटी व मौज म्हणून म्हाळसा मातेने महादेवाच्या फोटोकडे एकटक पाहणाऱ्या बाळाच्या डोळ्यासमोर साडीच्या पदराचा पडद्यासारखा अडथळा केला. मात्र फोटो दिसेनासा होताच बाळ लगेच अस्वस्थ होऊन कुणकुण करू लागले. मोठ्याने कधीच न रडणाऱ्या बाळाची ती केवळ कुणकुणही त्याच्या रडण्याचीच प्रक्रिया असते हे माता म्हाळसाला माहित होते. म्हणून बाळाची अस्वस्थता आणखी वाढू नये म्हणून आडोशासाठी घेतलेला पदर बाजूला केला. पूर्ववत महादेवाचा फोटो दिसू लागताच बाळ पुन्हा शांत झाले व त्या महादेवाच्या प्रतिमेकडे एकटक पाहू लागले. म्हाळसा मनातल्या मनात खुष होऊन हसत होती. संध्याकाळी भोजनसमयी बाळाच्या या कौतुकाची माहिती म्हाळसेने माता-पित्यांना दिली. भोजन करता करता सर्व परिवार त्या बाळलीलेने प्रमुदित झाला.
         बाळ रांगू लागले आता त्याच्यावर जास्त लक्ष देण्याची गरज होती. कारण संधी मिळाली की छोटा “जनू” रांगत रांगत देवघराकडे पळू लागायचा. देवघराकडे रांगत जाण्यात त्याला जास्त रंगत वाटायची. ज्या पावलांनी पुढे असंख्य भक्तांना ईश्वरमार्ग दाखवायचा होता, तीच छोटी पावले प्रथम देवघराच्या दिशेनेच वळत होती.
          सामान्य बालकांना खेळण्यांचे आकर्षण असते, परंतु या बालकाच्या पावलांना देवघराचे आकर्षण होते. जणू त्याच्या अंतःकरणात ईश्वरप्रेमाचा अंकुर जन्मताच फुलला होता. देवघराकडे रांगणारे ते बालरूप भविष्यात असंख्य जीवांना भक्तीमार्गावर चालण्याची प्रेरणा देणार होते.
         हे दृश्य परिवारासाठी अत्यंत आश्चर्यकारक व आनंददायी होते. मात्र व्यवस्थित मांडून ठेवलेल्या देवांच्या टाक-मूर्ती बाळाच्या खेळण्याने खालीवर होऊ नयेत तसेच देवघरात अखंड तेवत असणाऱ्या नंदादीपाचा बाळाला त्रास होऊ नये म्हणून सर्व परिवार दक्षता घेत असे.
            बाळासाठी घरात खेळणी, खुळखुळे येऊ लागले. परिवारातील सदस्य व नातलगांनी आणलेल्या नव्या खेळण्यांकडे बाळाचे लक्ष आकृष्ट व्हावे, बाळाने हसावे, त्या खेळण्या बाळमुठीत घेऊन खेळावे व ते आपण कौतुकाने पाहत बसावे अशी सर्वांची इच्छा असायची. परंतु बाळाला त्या खेळण्या व खुळखुळ्यांचे कोणतेही आकर्षण वाटत नव्हते. कुणी बळजबरीने त्याच्या बाळमुठीत एखादे खेळणे दिलेच तर तत्क्षणी ते खेळणे बाळ फेकून देत असे. संसारातील क्षणभंगुर आकर्षणांपासून अलिप्त राहण्याचा संदेश जणू त्या बालवयातच त्यांच्या वर्तनातून प्रकट होत होता. सृष्टीतील सर्वत्र पांगलेल्या नानाविध क्षणिक भोगवस्तूंकडे जे बालक जन्मताच प्रखर वैराग्य घेऊन आल्यामुळे आकृष्ट होणार नव्हते, ते या खुळखुळ्यांच्या व खेळण्यांच्या खेळात कसे रमू शकेल?
                या दैदिप्यमान बाळाच्या बाळलीलाही नेत्रदीपक होत्या. त्याकडे पाहणारे हरखून जायचे आणि स्वतःला विसरून जायचे. हीच खुण होती त्या बाळाच्या असामान्यत्वाची. बाळाचे बोबडे बोल व उच्चार मातेसह मोहिते परिवाराला जणू वेदमंत्रांचा आनंद देत होते. कधी “आई”, कधी “देव”, अशा मंजुळ स्वरातील उच्चार करणाऱ्या बाळाने जणू संकेतच दिला असावा की आयुष्यात आई आणि देव यांच्याखेरीज कुणाचाच लळा असणार नव्हता.
               मातेच्या दुधावर व त्यानंतर गोमातेच्या दुधावर वाढ होणाऱ्या बालकाचे आरोग्य निकोप होते. तरी वय वाढत असताना बाळाची वृत्ती व स्वभाव नवजात शिशूप्रमाणेच निरागस व निर्मळ राहिला. बालकाच्या बोबड्या उच्चारांची जागा आता सुस्पष्ट अक्षरांनी व अर्धवट तुटक वाक्यांनी घेतली होती. बाळाचे मामा पूजापाठ करीत बसले की, बाळाने त्यांच्या जवळ जाऊन बसावे, गंध लावून घ्यावा व ग्रंथ हातात घेऊन उगाचच पाने चाळीत बसावे. हे दृश्य अत्यंत मनोहारी होते. दिवसेंदिवस गंधाची, ग्रंथांची व पुस्तकांची बाळाची वाढती जिज्ञासा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरू लागली.
              ज्या हातांनी अजून अक्षरे ओळखली नव्हती, त्याच हातांना ग्रंथांचा स्पर्श प्रिय वाटत होता. ही केवळ बालक्रीडा नव्हती; ती भविष्यातील ज्ञानदीपाच्या प्रज्वलनाची पूर्वतयारी होती. जणू सरस्वतीमातेची कृपादृष्टी त्या बालरूपावर आधीपासूनच स्थिरावली होते अक्षरांचे ज्ञान नसतानाही ग्रंथांविषयी असलेली ओढ पाहून घरातील ज्येष्ठ मंडळींना आश्चर्य वाटायचे. भविष्यात ज्ञान, भक्ती आणि अध्यात्म यांचा दीप प्रज्वलित करणारे हेच बालक असल्याची जाणीव नकळत सर्वांच्या मनात उमटू लागली.
        परिवाराला त्या वेळी या सर्व घटनांचे पूर्ण महत्त्व कदाचित जाणवत नव्हते. परंतु काळाच्या ओघात प्रत्येक लहानशी लीला, प्रत्येक कृती आणि प्रत्येक संकेत हे एका महान संतजीवनाच्या सुवर्णपानांमध्ये परिवर्तित होणार होते. त्या बालकाच्या भोवती अदृश्यपणे विणली जात असलेली ही दिव्य कथा भविष्यात असंख्य भक्तांच्या श्रद्धेचा आधार बनणार होती.
              बालपणातील या साध्यासुध्या वाटणाऱ्या लीला प्रत्यक्षात एका महान संतचरित्राची प्रारंभिक चिन्हे होती. त्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक नजरेत आणि प्रत्येक निरागस कृतीत भविष्यातील लोककल्याणाचा दिव्य संकेत दडलेला होता. त्या बालरूपात भविष्यातील एक तेजस्वी अध्यात्मदीप शांतपणे प्रज्वलित होत होता.

॥ क्रमशः भाग पुढे ॥

संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवनचरित्र, दिव्य कार्य आणि अलौकिक लीलांचे सविस्तर दर्शन घेण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
janardanmauli.blogspot.com

         जनार्दन माऊलींच्या श्रमयोग आणि सेवाभावाची प्रेरणा अधिकाधिक समाजापर्यंत पोहोचावी, यासाठी हा लेख आपल्या परिचितांपर्यंत अवश्य पोहोचवा.

#जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीमहाराज #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र #माऊली #चरित्र #janardan #janardanmauli #janardanswami #janardanswamimaharaj #janardanswamicharitra #santcharitra #mauli #charitra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज यांची जीवनगाथा

 सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज – जीवन गाथा  वैयक्तिक परिचय व जीवनप्रवास  एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते लाखो भाविकांचे श्रद्...