✍️🌿✨ रात्रीचा चमत्कार – एकाच वेळी दोन ठिकाणी असण्याची दिव्यता✨🌿✍️
शांत बसलेल्या जनार्दनाने काहीही होकार-नकार न दिल्याने ती त्याची मुकसंमती मानून शेठजींनी निर्णय दिला उद्या दिवस आणि रात्र खळ्याची राखणदारी फक्त जनार्दन करेल. बाकी सर्व गडीमजुरांना शिऊरच्या यात्रेसाठी सुट्टी.
एका संताच्या जीवनात “सेवा” आणि “साधना” या दोन पंखांसारख्या असतात. खळ्याची राखणदारी ही सेवा होती, आणि शिऊरचं किर्तन ही साधना. संत दोन्ही एकाच वेळी निभावू शकतात, कारण त्यांचं मन भगवंताला अर्पण झालेलं असतं. ठरल्याप्रमाणे घडलं. सगळे गडीमजूर शिऊरला यात्रेला गेले. एकटा जनार्दन खळ्यात थांबला होता. रात्री १० वाजण्याच्या सुमारास खुशालशेठ खळ्याकडे चक्कर मारायला आले. एवढ्या मोठ्या खळ्यात एकटा जनार्दन थांबला होता. काही विपरीत घडू नये आणि जनार्दनालाही धीर यावा म्हणून ते गेले. सगळ्या धान्याच्या राशी, शेतीची अवजारे सुरक्षित होती. गाई-बैल, वासरं शांतपणे रवंथ करत होती. आणि जनार्दन? समोर खाटेवर घोंगडी टाकून शांतपणे राखणदारी करत होता. अपरात्री उगाच प्रश्नोत्तरं करून त्याला त्रास द्यायचा नाही असं वाटून शेठजी घरी निघाले. खळ्याच्या मेढीला अडकवलेल्या कंदीलाच्या प्रकाशात त्यांनी घड्याळात वेळ पाहिली – रात्रीचे बरोबर १० वाजले होते.
त्याच वेळी शिऊरच्या यात्रेत इतर गडीमाणसं मंदिरात दर्शन करून बाजारात फिरत होती. विविध दुकानांचा थाट पाहत, मनोरंजनाचे खेळ पाहून ती मंडळी आता तमाशाकडे निघाली होती. तमाशाच्या फडातून येणाऱ्या आवाजाने ती आकर्षित झाली होती. पूर्वरंग संपून आता वग सुरू होणार होता. तमाशाच्या फडाकडे जाताना जवळच सुरू असलेल्या किर्तन मंडपाकडे त्यांचं लक्ष गेलं आणि सगळे अवाक् झाले. रात्रीचे १० वाजले होते, आणि किर्तनाच्या मंडपात हात टाळ घेऊन जनार्दन किर्तनाचा आनंद घेत उभा होता काय आश्चर्य! शरीर करंजगावच्या खळ्यात राखण करत होतं, आणि आत्मा शिऊरच्या किर्तनात डोलत होता. हीच तर भगवद्भक्तीची परमोच्च अवस्था जिथे भक्त आणि भगवंत यांच्यात अंतर उरत नाही.
सगळे गडी एकमेकांकडे मिश्कीलपणे पाहून हसले. कारण आता सकाळी शेठजीसमोर जनार्दनाची मोठी चूक सिद्ध होणार होती. त्यांचा लाडका जनार्दन! “बघू आता कशी गंमत होते. आता जनार्दनाचा सूड उगवणारच. पण या कपटनाट्याचा कुणी खात्रीचा साक्षीदार हवा.” असा विचार करत असतानाच समोरून घोड्याच्या तांद्यात बसून मोतीशेठ आले. मोतीशेठ म्हणजे खुशालशेठचे बंधू, एकाच परिवारात राहणारे.
धावत जाऊन गड्यांनी त्यांचा तांगा थांबवला. मोतीशेठ गरजले, काय रे, का थांबवलं? काही हवं का यात्रेसाठी? नाही शेठ, आम्हाला काही नको. मग का थांबवलं? ते तिकडे बघा… अरे, तिथे किर्तन चालू आहे. त्यात काय नवल? यात्रेत किर्तनं असतातच. नाही शेठजी, तिथे बघा कोण उभा आहे… कोण उभा आहे? अहो, आपल्या मळ्यातला गडी जनार्दन उभा आहे, टाळ घेऊन.
मोतीशेठ म्हणाले, अरे मग बिघडलं कुठे? त्याला किर्तनाची आवड आहे म्हणून गेला असेल तिथे. नाही शेठजी, त्याला एकट्याला खळ्याची राखणदारी सोपवून खुशालशेठजींनी आम्हाला इकडे यायला सुट्टी दिली आहे. ठीक आहे, पुढे बोला. खळ्याची राखणदारी सोडून आला. त्याने शेठची आज्ञा तोडली. शेठचा विश्वासघात केला. पुढे? बस्स, एवढंच दाखवायचं होतं. ठीक आहे, उद्या पाहू. चला जा… पळा
मोतीशेठच्या मनात कदाचित एक सूक्ष्म जाणीव जागी झाली असावी सामान्य माणूस एकाच वेळी दोन ठिकाणी नसतो. हा तर काहीतरी वेगळाच आहे. संतांच्या लीला बुद्धीला कधीच आकळत नाहीत, त्या फक्त श्रद्धेने अनुभवता येतात. जनार्दनाची एवढी मोठी चूक मोतीशेठनी मनावर का घेतली नाही याचं गड्यांना आश्चर्य वाटलं. पण त्यांना वाटलं, “जाऊ द्या. शेठजीने मनावर घेतलं नाही तरी चालेल. सकाळी हा गुंता सिद्ध करायला त्यांना मोतीशेठच्या रूपाने मोठा साक्षीदार मिळाला आहे. हेच काय कमी आहे?
दुसरा दिवस. सकाळ संपली होती. सगळे गडीमजूर कामावर हजर झाले. जनार्दनही आपल्या कामावर पोहोचला. नित्याच्या सवयीप्रमाणे तो लक्षपूर्वक काम करू लागला. पण इतर गड्यांचं लक्ष कामात नव्हतं. त्यांचं लक्ष रस्त्याकडे होतं. खुशालशेठ येतील कधी आणि हे सगळं घडलं ते आम्ही त्यांना सांगू कधी – यासाठी ते उतावीळ झाले होते. आणि त्याच वेळी नेहमीप्रमाणे शेतात चक्कर टाकून कामाच्या सूचना आणि पाहणी करायला खुशालशेठ शेतात आले. त्याच संधीची वाट पाहणारे गडीमजूर त्यांच्याभोवती गोळा झाले.
प्रश्नार्थक मुद्रेने जमलेल्या गड्यांकडे पाहून शेठजींनी इशारा केला काय भानगड आहे? तेव्हा सगळे मजूर म्हणाले, शेठजी, काल तुम्ही आम्हा सगळ्यांना शिऊरच्या यात्रेत जायला सुट्टी दिली होती. हो, दिली होती सुट्टी. पुढे?जनार्दनाला खळं राखायला ठेवलं होतं ना? अगदी बरोबर, पुढे काल आम्ही सगळे शिऊरच्या यात्रेला गेलो होतो. बरं, पुढे काय? काय सांगायचं शेठजी, खळ्याची राखणदारी सोडून हा जनार्दन शिऊरला किर्तनात उभा होता.
शेठजींचे डोळे विस्फारले, “काय सांगता?” “हो, खरंच सांगतो. आम्ही काल रात्री स्वतः डोळ्यांनी पाहिलं.” “किती वाजता?” “बरोबर रात्री १० वाजले होते.” “कशावरून सांगता?” “स्वतः मोतीशेठजींनी पण पाहिलं.” “अरे, कसं शक्य आहे?” “काय सांगू शेठजी, तुम्ही स्वतःच मोतीशेठजींना विचारा आणि खात्री करा. तुम्हाला खरी बातमी कळेल. लई कौतुक करता ना जनार्दनाचं. बघा आता कसा विश्वासघात केला. तुम्हाला कसं फसवलं त्याने. बघा आता. आमचं खोटं मानू नका शेठ.” शेठजी फक्त “हं…” म्हणाले. शेठजींच्या मनात द्वंद्व सुरू झालं – एकीकडे डोळ्यांनी पाहिलेला जनार्दन खळ्यात, आणि दुसरीकडे विश्वासू भावाचा शब्द की जनार्दन किर्तनात. हीच ती परीक्षा, जिथे तर्क संपतो आणि श्रद्धा सुरू होते. खुशालशेठ विचारात पडले. मी स्वतः रात्री १० वाजता जनार्दन खळ्यात थांबलेला पाहिला. आणि हे असं सांगतात. नक्की काय घडलं? इतर गडी मत्सरापोटी जनार्दनाला बदनाम करतात हे शेठजींना ठाऊक होतं. कदाचित त्यावेळून हे घडलं-रडलं असावं असं वाटून शेठजी तिथेच विचारात गर्क झाले. एका व्यक्तीला एकाच वेळी दोन ठिकाणी कसं दिसेल? काहीतरी गडबड दिसते.
शेठजी म्हणाले, “कोण आहे तिकडे?” “जी शेठ, काय काम आहे?” “आत्ताच्या आत्ता मोतीशेठला इथे बोलावलं म्हणून निरोप दे, पळ लवकर.” निरोप मिळताच मोतीशेठ आले. खुशालशेठ आणि मोतीशेठ हलक्या आवाजात बोलू लागले. त्या चर्चेतून खुशालशेठची खात्री पटली की जनार्दन रात्री १० वाजता किर्तनात टाळ घेऊन उभा होता. मोतीशेठ खोटं बोलण्याचा प्रश्नच नव्हता. मोतीशेठला जायला सांगून खुशालशेठ वस्तीच्या ओट्यावर सावलीत बसले.
मधाच्या पोळ्याला धक्का लागल्यावर माशा जशा भणाणतात, तसे असंख्य विचार खुशालशेठच्या डोक्यात आणि डोक्याभोवती भणभणू लागले. एकच देह, दोन ठिकाणी? हे मायेचं खेळ आहे की योगसामर्थ्य? खरंच, ज्याचं मन भगवंतात तल्लीन झालं आहे, त्याला देश-कालाची बंधनं लागू पडत नाहीत. एकच व्यक्ती एकाच वेळी दोन ठिकाणी दिसावी? हा आभास की वस्तुस्थिती? मोतीशेठने शिऊरला जनार्दनाला पाहिलं हे खरं, आणि त्याच वेळी मी जनार्दनाला खळ्यात पाहिलं हेही खरं. असं घडू शकतं का? कुणी कधी ऐकलं का अशा प्रकाराबद्दल? शेठजी शेतात आपल्याच नादात व्यग्र असलेल्या जनार्दनाकडे पाहायचे आणि आपल्या घड्याळाकडे पाहायचे. तिकडे जनार्दनाचं काम व्यवस्थित चालू होतं आणि इकडे शेठजींच्या हातलं घड्याळही व्यवस्थित चालू होतं. काहीही बिघडलं नव्हतं. तरी काहीतरी घडलं होतं हे नक्की.
श्रीमद् भागवतात भगवंताच्या “रासलीलेचा” प्रसंग वर्णन केला आहे. श्री शुकदेव पुण्यश्लोक राजा परीक्षितीला तो प्रसंग सांगत होते… “शरद पौर्णिमेच्या” त्या रात्री श्रीहरींनी आपली बासरी वाजवली. त्या स्वराच्या माधुर्याने मोहित झालेल्या आणि त्या स्वरातून स्पष्ट होणाऱ्या संकेताने सर्व गोपी गावाबाहेर त्या ठिकाणी पळत गेल्या, जिथे श्रीहरी मुरली वाजवत होते. रात्रीचा प्रहर. जेवण तयार करणं, वाढणं, खाणं, उष्टी-खरकटी भांडी साफ करणं, अंथरुणं टाकणं, बालकांना झोपवणं, परिवारातील ज्येष्ठांची सेवा करणं – अशा अनेकविध नित्यकर्मांची धांदल उडणारी वेळ. ती सगळी कामं अर्धवट सोडून पळण्याचा प्रयत्न गोपिनी करत होत्या. त्यांना अडवण्यासाठी त्यांच्या पतींनी आणि परिवारातील सदस्यांनी खूप प्रयत्न केले – धमकावलं, दटावलं, कोंडून ठेवलं, बांधून ठेवलं. तरीही गोपी त्या क्षणी श्रीहरीसमोर हजर झाल्या होत्या. आणि तसंच, त्या सगळ्या गोपी त्यांच्या घरातही उपस्थित होत्या. त्यांची उपस्थिती परिवार पाहत होता. पळून गेल्या नाहीत, मग पुन्हा चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. एकाच वेळी सगळ्या गोपी स्वतःच्या घरात, परिवारात उपस्थित होत्या आणि त्याच वेळी त्या सगळ्या गोपी श्रीहरीसमोरही उभ्या होत्या.
भागवतातील ही रासलीला केवळ कथा नाही, तर ती भक्तीच्या त्या अवस्थेचं दर्शन आहे जिथे भक्त एकाच वेळी संसारातही असतो आणि भगवंतासमोरही असतो. शरीर कर्म करतं, पण मन मात्र केवळ कृष्णात रमतं. मग खऱ्या गोपी कोणत्या? घरात दिसणाऱ्या की श्रीहरीसमोर उभ्या असलेल्या? एकाच वेळी एकाच गोपीने दोन ठिकाणी दिसावं? हे कसं? करंजगावच्या स्वतःच्या शेतात काम करणाऱ्या जनार्दनाच्या बाबतीतही खुशालशेठ हाच विचार करत होते, की एकच जनार्दन एकाच वेळी करंजगावच्या खळ्यात आणि त्याच वेळी शिऊरच्या समाधीतील किर्तनात कसा? भगवद्भक्तीच्या परमोच्च अवस्थेला पोहोचलेल्या गोपिकांसाठी गोपालकृष्ण ज्या त्या गोपीच्या रूपात त्यांच्या परिवारात होता.
मग नक्की भगवद्भक्ती जनार्दनाची असलीच पाहिजे. अन्यथा दोन्ही रूपात एक जनार्दन कसा राहील? जनार्दन कोणता आणि त्याच्या रूपातील देव कोणता? खळ्यातला की किर्तनातला? हे वास्तव होतं. आभास नव्हता. _आता शेठजींच्या डोळ्यातून केवळ आश्चर्य नव्हे, तर अश्रू वाहू लागले. कारण त्यांना जाणवलं हा गडी नाही, हा साक्षात भगवद्भक्त आहे. आणि मी त्याच्याकडून काम करून घेत होतो! खुशालशेठ रोमांचित झाले. डोळ्यात आनंदाश्रू आले. अशा महान भगवद्भक्ताने माझ्या मळ्यात मजुरी करावी? नाही, एवढी लायकी नाही. बरं, आता कळलं. आता ओळखलं गंभीर स्वरात खुशालशेठ म्हणाले, “जनार्दना! इकडे ये.” कामात असल्याचं नाटक करणारे इतर गडी कान टवकारून ऐकत होते. आता जनार्दनाला हाका मारल्या. आता खरी गंमत बघू… कशी शिक्षा देतो त्याला अशा उत्सुकतेने ते तिकडे पाहत होते.
“जनार्दन, इकडे ये. असा उभा रहा.” आणि गड्यांनी पाहिलं… जनार्दनाच्या पायावर डोकं ठेवून खुशालशेठ रडत होते. हात जोडून क्षमा मागत होते. _क्षणभर सगळं जग स्तब्ध झालं. धनाढ्य शेठ मजुराच्या पाया पडतोय! कारण शेठला कळलं – खरा मोठेपणा पैशात नाही, तर भगवद्भक्तीत आहे. आणि खरा मालक तो नाही, तर जनार्दनाच्या रूपातील तो परमेश्वर आहे.
पुढील भाग क्रमशः
संत जनार्दन माऊलींचे दिव्य अलौकिक कार्य, दिव्य चरित्र, जीवन चरित्रातील लीलांचे अलौकिक कार्याचे दर्शन घेण्यासाठी पुढील लिंक अवश्य भेट द्या.
Janardanmauli.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा