बुधवार, २० मे, २०२६

भाग १ 🚩🔱✨ जनार्दन माऊलींचे अवतार दिव्यत्व ✨🔱🚩


 भाग १

✍️🔱✨ जनार्दन माऊलींचे अवतार दिव्यत्व ✨🔱✍️

           सामान्य जीव या सृष्टीत जन्माला येतात, मात्र अवतार पुरुष अर्थात संतपुरुष ‘अवतार’ घेतात. अवतार म्हणजे वरतून खाली येणे. जणू आकाशाने मातीला मिठी मारणे म्हणजे अवतार आणि मातीने आकाशाला आलिंगन देण्यासाठी केलेला उत्थापन प्रयास म्हणजे साधना. हीच अध्यात्मिकता.

"परित्राणाय साधूनां विनाशय च दुष्कृताम । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥"

       भगवंताने श्रीमद्भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या माध्यमातून समस्त सुसंस्कृत समाजाला व भाविक भक्तांना आपल्या अवताराचे आश्वासन दिलेले आहे. साधुंच्या साधुवृत्तीच्या संरक्षणासाठी आणि दुष्कर्मींच्या विनाशासाठी युगानुयुगे मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो, अशी स्पष्ट कबुली श्रीकृष्ण भगवंतांनी दिलेली आहे. भगवंताचे असे अनेक अवतार पृथ्वीवर झाल्याची नोंद विविध धर्मग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये, वेद-उपनिषदांमध्ये आढळते. त्यात काही अंशावतार तर काही पूर्णावतार असे वर्णन आहे.

           कोणत्याही एका कार्यासाठी एकाच वेळी एक अवतार हा भगवंताचा अंशावतार मानतात. जसे हिरण्याक्षासाठी वराह अवतार, हिरण्यकश्यपूसाठी नृसिंह अवतार. मात्र श्रीराम अवतार व श्रीकृष्ण अवतार हे पूर्णावतार मानले जातात. ते सर्वांच्या कल्याणासाठी घेतलेले असतात. श्रीरामायण, श्रीमद्भागवत, महाभारत यांसारख्या ग्रंथांत या अवतारांच्या पूर्णत्वाच्या खुणा स्पष्ट वर्णिलेल्या आहेत. साधु-साधुवृत्तींच्या संरक्षणासाठी आणि दुष्प्रवृत्तींच्या विनाशासाठी भगवंत वेळोवेळी अवतार घेतात हे खरे आहे. मात्र जे सर्वसामान्य मानव आहेत ते शंभर टक्के दुष्प्रवृत्तीचेही नसतात आणि पूर्णपणे सद्गुणीही नसतात.

           उदाहरणच द्यायचे तर ते ना हिरण्यकश्यपु होऊ शकतात आणि ना प्रल्हाद होऊ शकतात. महिलांच्या बाबतीतही त्या ना शूर्पणखा होऊ शकतात आणि ना शबरी होऊ शकतात. मग अशा मध्यवृत्तीतील मानवांच्या उद्धारासाठी कोणती योजना? कोणता अवतार? भगवान सर्वांतर्यामी आहे, सर्वव्यापी आहे. मग त्या भगवंताने सामान्य मानवांच्या उद्धाराची योजना केली आहे का? या प्रश्नाचे उत्तर आहे — होय.

           विचारवंतांच्या मते, "देवाने माणूस झाल्याशिवाय माणसाला देवपण कळत नाही आणि देवपण कळले नाही तर माणूस देवप्राप्तीची इच्छा करत नाही." यासाठीच देव कधी पृथ्वीवर माणसाच्या रूपात प्रकट होतात. त्यांना आपण "देवमाणूस" म्हणतो. हेच अवतार पुरुष, हेच सत्पुरुष. संतांचा जन्म हाच अवतार मानला जातो.

           भगवंताचे पूर्णावतार किंवा अंशावतार हे विशिष्ट कार्यासाठी येतात, परंतु संत अवतार मानवाला मानवतेतून देवत्वाकडे नेण्यासाठी अवतरतात. ते चमत्कारांनी नव्हे तर प्रेमाने, उपदेशाने, आचरणाने आणि नामभक्तीने समाजाचे परिवर्तन करतात. संतांच्या सहवासात सामान्य माणसाला स्वतःचे दोष दिसू लागतात, सद्गुणांची ओढ निर्माण होते आणि ईश्वरप्राप्तीची तळमळ जागृत होते. संत म्हणजे चालते-बोलते शास्त्र, संत म्हणजे करुणेचा सागर, संत म्हणजे भगवंताच्या कृपेचे जिवंत स्वरूप. त्यामुळेच संतांचा जन्म हा केवळ एका व्यक्तीचा जन्म नसून असंख्य जीवांच्या कल्याणासाठी भगवंताने दिलेली दिव्य देणगी मानली जाते.

          "संत कृपा झाली, इमारत फळा आली" या संतवचनाप्रमाणे संतांचे आगमन म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीची नांदी असते. संत स्वतः मुक्त होऊन थांबत नाहीत, तर इतर जीवांनाही मुक्तीचा मार्ग दाखवतात. म्हणूनच संतांचे जीवन, त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य हे समाजासाठी प्रेरणेचे आणि कल्याणाचे अखंड स्रोत ठरतात. याच संतावतार परंपरेत अनेक थोर संतांनी भारतभूमीला पावन केले. त्यांनी आपल्या जीवनकार्याने असंख्य जीवांच्या अंतःकरणात भक्ती, श्रद्धा आणि सदाचाराची ज्योत प्रज्वलित केली. अशाच संतपरंपरेतील एक तेजस्वी, करुणामय आणि लोककल्याणासाठी अवतरलेले दिव्य व्यक्तिमत्त्व म्हणजे जनार्दन माऊली होय. त्यांच्या जीवनातील अवतारी खुणा, कार्य आणि दिव्यत्वाचा परिचय पुढील भागात पाहू क्रमशः

       जनार्दन स्वामींचे संपूर्ण जीवन चरित्र बघण्यासाठी पुढील लिंक जरूर ओपन करा व माऊलींचे संपूर्ण जीवन आत्मसात करा.

#janardan #जनार्दन #janardanMauli #जनार्दनमाऊली #चरित्र #जनार्दनस्वामीमहाराज #जनार्दनस्वामीचरित्र 

1 टिप्पणी:

गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज यांची जीवनगाथा

 सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज – जीवन गाथा  वैयक्तिक परिचय व जीवनप्रवास  एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते लाखो भाविकांचे श्रद्...