गुरुवार, २१ मे, २०२६

भाग -२ जनार्दन माऊलींचे अवतार दिव्यत्व आणि संतस्वरूप


✍️✨⚜️ जनार्दन माऊलींचे अवतार दिव्यत्व आणि संतस्वरूप ⚜️✨✍️

             सामान्य जीव त्याच्या स्वतःच्या इच्छेने जन्म घेत नाही तर गत कर्माची फलनोन्मुख स्थिती म्हणजे प्रारब्ध भोगण्यासाठी त्याला जन्म घ्यावा लागतो. "दुःखासी कारण जन्म घ्यावा" या संतवचनाने हे सर्व सहज स्पष्ट होते.

              सामान्यांच्या बाबतीत कुठे जन्मावे, कुठे जावे, कुठे जगावे, कसे जगावे, व कसे आणि कुठे भरावे हे स्वतःच्या हातात नसते. प्रारब्धानुसार हे घडते. मानव प्रारब्धाने परतंत्र असतो. जेल मध्ये अर्थात कारावासात शिक्षा भोगणारा कैदी सर्वथैव जसा परतंत्र असतो. कारागृहात जाणे येणे तो ठरवित नाही. त्याचे ईच्छेप्रमाणे हे नसते. मात्र कारागृहाचा अधिक्षक नियंत्रक अधिकारी कारागृहात राहुनही कारागृहातील बंधनात बांधलेला नसतो. कारागृहात आत जाणे बाहेर पडणे यात तो स्वतंत्र असतो. त्याच अनुषंगाने पहाता सामान्यांचा जन्म प्रारब्ध भोगणेसाठी सिमीत जीवन जगतो, मात्र महापुरूष, संत हे स्वतंत्रवृत्तीने सृष्टीच्या कल्याणासाठी येथे स्वइच्छेने येतात. (जन्म घेतात), राहातात, कार्य करतात व आपल्या निजपदावर निजधामास सहज निघुन जातात.

            अवतार प्रणालीची अशीच खुण असते. म्हणुनच संत हे भगवंताचेच अवतार मानले जातात. "संत तेची देव - देव तेचि संत" अशी संतवचने आहेतच. सृष्टीत देवांचे अवतार हे शासन व्यवस्थेसारखे असतात. "विनाशायच दृष्कृताम" पदाचा भावार्थ तोच आहे. देव अवतार ही सृष्टीतील शासन व्यवस्था आहे. मात्र संतांचे अवतार हे सृष्टीतील "अनुशासन" व्यवस्था आहे.

              देव हे अवतार घेतांना हातात शस्त्र घेवुन येतात. जसे श्रीरामाचे धनुष्य हनुमंताची गदा, श्री शंकराचा त्रिशुळ, दुर्गाभगवतीची तलवार, श्रीकृष्णांचे सुदर्शन चक्र तात्पर्य, देव हे अवतार कार्य शस्त्राव्दारे क्रांती करतात. परिवर्तन करतात. मात्र संतांचे अवतार कार्य शस्त्राने नव्हे तर शास्त्राने घडते. आतापर्यंत झालेल्या अनेक संत अवतारांचे चरित्र पहावे. कोणत्याही संताच्या हातात कोणतेही शस्त्र नसल्याचे दिसुन येईल. देवांच्या विविध अवतार कार्यात अनेकानेक दुष्ट, दुर्जन राक्षसांचा वध केल्याचे स्पष्ट वर्णन ग्रंथात आहे. देव अवतारात प्रत्यक्षात त्या असुरांना कंठस्नानानेच संपविले.

             मात्र संतांनी त्या दुष्प्रवृत्तींच्या असुरी लोकांना शास्त्राव्दारे परिवर्तन करून त्यांचा उध्दार केला. प्रचंड पाप प्रवृत्तीने दरोडे घालणारा क्रूर कर्मा ज्याने अनेक निष्पाप माणसांचे बळी घेतले तोच दरोडेखोर ब्रम्हर्षी नारदांच्या सहवास सेवा अनुग्रहाने त्याच जन्मात वाल्मिक ऋषी म्हणुन प्रसिध्द झाले. अशा कितीतरी घटनांची प्रसंगांची नोंद पुराणात आहेच. संत जीवन चंदनवृक्षाप्रमाणे शितल सुगंधीत मौलिक असते. चंदनाचे संगतीत आसपास असणाऱ्या काटेरी वृक्ष, लतांनाही चंदनाचा सुगंध लागतो. चंदन घासला तरी सुगंध, जाळला तरी सुगंध, चंदन वृक्ष तोडतांना कुन्हाडीलाही सुगंधच मिळतो. असेच संतांचेही सामर्थ्य असते. सेवेने उध्दार होतोच, मात्र त्यांच्या विरोधात कार्य करणारेही शेवटी "संतत्वाला" पोहोचतात. साधु स्वभावाची, संतत्वाची स्पष्ट खुण आपल्या संत वाङमयात सर्व परिचीत आहेच ती म्हणजे -

॥ जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा । देव तेथेची जाणवा ॥

           संत हृदय हे दयाळु कृपावंत, प्रेमामृताने भरलेले असते. मानव जन्म घेवुन अज्ञानाने, कुसंगाने भ्रमिष्ट होवुन अनुचित कर्म करणाऱ्या व परिणामी पर्वतप्राय दुःखाने हीन दीन झालेले लोक पाहुन संत त्यांचे जवळ जाऊन त्यास कल्याण प्राप्तीची प्रेरणा आणि दिशा देतात.

"आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणाशी" ॥

           अशी स्वतःची स्पष्ट ओळख देवुनही प्रापंचीक बुध्दीने बांधलेले लोक त्यांना ओळखु शकत नाही.

पुढील भाग क्रमशः 

संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवनचरित्र, दिव्य कार्य आणि अलौकिक लीलांचे सविस्तर दर्शन घेण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

https://janardanmauli.blogspot.com

#जनार्दन #जनार्दनमाऊली #जनार्दनस्वामीमहाराज #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र #माऊली #चरित्र #janardan #janardanmauli #janardanswami #janardanswamimaharaj #janardanswamicharitra #santcharitra #mauli #charitra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज यांची जीवनगाथा

 सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज – जीवन गाथा  वैयक्तिक परिचय व जीवनप्रवास  एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते लाखो भाविकांचे श्रद्...