भाग -४
✍️✨🌼 दिव्य अवताराची पूर्वतयारी आणि जनार्दन माऊलींचा शुभजन्म 🌼✨✍️
निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत प. पू. सद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराजांच्या अवतरण अविष्काराच्या अर्थात जन्माच्या व्यवस्थेसाठी सृष्टीची अशीच पूर्वतयारी घडत होती. मोहिते पाटलांच्या माध्यमातुन पवित्र मातुलकुळ आणि पतिव्रता म्हाळसाच्या माध्यमातुन मातृत्व निश्चीत झालेले होते. बाळंतपणासाठी म्हाळसा दहेगावाहुन माहेरी टापरगावी निघाली. थोरामोठ्यांचे आशिर्वाद आणि ओटीभरण होताच ती गाडीत बसली. आनंदाने आणि औस्तुक्याने दहेगावच्या उगले पाटील परिवार व संबंधीतांनी तीला प्रेमाचा निरोप दिला.
सगर्भाअवस्थेतील म्हाळसा दृष्ट लागावी अशी दिसत होती. टापरगावी माहेरच्या वाडयासमोर पोहोचताच माता शेवंताबाईंनी म्हाळसाच्या डोक्यावरून भाकरीचा तुकडा व लोटाभर पाणी ओवाळुन पलिकडे फेकले. जणु प्रवासात लागलेली दृष्ट उतरवुन फेकुन दिली. म्हाळसाला आता "सातवा" महिना लागला होता, तीच्या खाण्यापिण्याची व विश्रांतीची महिला वर्गाकडुन व मातेकडुन कटाक्षाने काळजी घेतली जात होती. माता व बालकाच्या निकोप वाढीसाठी हे ठिक होते. पण अजुनही काही व्यवस्था करावी लागते याचे भान बंधु बाबुराव मोहिते यांना असावे. बालकाच्या तनामनावर प्रकृतिस्वभावावर काही संस्कार व्हावे लागतात.
म्हाळसाला समोर बसवुन तिचे बंधु बाबुराव भागवत ग्रंथाचे वाचन करू लागले. सगर्भा म्हाळसा बसल्या बसल्या सुस्ती यावी, अंमळ झोपेची डुलकी यावी अशा अवस्थेत होती. पण तरीही बाबुराव भागवत ग्रंथाचे वाचन मोठया आवाजात करीतच रहायचे. तो ग्रंथ म्हाळसाने ऐकलाच पाहिजे असा बाबुरावांचा तिला आग्रह देखील नव्हता. ते वाचन तीच्या पवित्र कुशीत प्रविष्ट असलेल्या एका महान शिवयोगी भगवद्भक्त अवतार पुरूषासाठी होते.
या खेरीज वेळी प्रसंगी प्रवचने, किर्तन, सत्संग आणि भजनाच्या कार्यक्रमात म्हाळसाला बाबुराव जाणीवपुर्वक बसायला लावायचे.म्हाळसाला नववा महिना उलटुन गेला होता. दिव्य बालकाच्या जन्मासाठी पवित्र स्थळ, काळ, वेळ आणि शुभग्रहदशा जुळुन येत होती. जवळ येत होती.
धन-धान्याने संपन्न धरणीमातेचा सौभाग्य अलंकार अशा दसरा, दिपावलीचा पवित्र आश्विन महिना. त्या वर्षाचे/ संवत्सराचे नाव होते आनंदनाम सवंत्सरे. शुक्ल पक्ष, गुरूवार, ललिता पंचमी, अनुराधा नक्षत्र, वाणिज करण, विष्कंभ योग, वृश्चिक रास, देवगण, नभोमंडळातील नवग्रहांपैकी बहुतांश ग्रहस्थिती अत्यंत शुभ, शके १८३६ वेळ सूर्योदयाची आणि दिनांक २४/०९/१९१४ अशा पवित्र शुभप्रसंगी महान शिवयोगी, त्यागी, तपस्वी संत निश्काम कर्मयोगी राष्ट्रसंत प. पू. सद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराजांचा जन्म झाला.
पुढील भाग क्रमश:
संत जनार्दन माऊलींचे संपूर्ण जीवनचरित्र, दिव्य कार्य आणि अलौकिक लीलांचे सविस्तर दर्शन घेण्यासाठी खालील लिंकला अवश्य भेट द्या .
janardanmauli.blogspot.com
#जनार्दन #जनार्दनमाऊली #Janardan #JanardanMauli #जनार्दनस्वामीचरित्र #संतचरित्र #आध्यात्मिकता #भक्ती

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा