शुक्रवार, २२ मे, २०२६

भाग - 3 जनार्दन माऊलींचे अवतार दिव्यत्व : संतजन्माची दैवी पूर्वतयारी

✨ जनार्दन माऊलींचे अवतार दिव्यत्व ✨

गृहस्थ जीवनाच्या दृष्टीने ती घटना व त्या क्षणाकडे कौतुकाने, वेगळेपणाने पाहण्याची उगले पाटलांना फारशी आवश्यकता वाटली नसावी. कारण काय? हे नित्याचेच असते. घडतच असते. नवअंकुराच्या नाविण्याकडे केवळ निसर्ग नियमाने पाहणाऱ्यास काय अप्रुप वाटणार?

मात्र हया नव निर्मितीच्या वृत्ताने मोहिते परिवारच नव्हे तर संपुर्ण टापरगाव प्रमुदीत झाले. दबलेल्या आवाजात चर्चा करून माहेरची मंडळी आनंदाच्या टाळया देउ लागले, घेवु लागले.

जनकल्याणाच्या व सुसंस्कृत समाज व्यवस्थेच्या संवर्धनाच्या सत्‌कार्यासाठी विश्वप्रकृतीने एखादया व्यक्तीस निवडले की ती व्यक्ती सृष्टीत विशेष वाटु लागते. म्हाळसा आता व्यक्ती नव्हे व्यक्तीविशेष ठरली होती. म्हाळसा आता वेगळ्या चैतन्याने भारावल्या सारखी दिसु लागली. तिच्या प्रत्येक वाक्यातुन, कार्यातुन आणि श्वासातुन दिव्यत्वाच्या स्पंदनांचे तेज जाणवु लागले.

देवापासुन दुरावलेल्या आणि अराजकतेने अशांत झालेल्या मानव समाजाच्या सुख - शांती प्राप्तीचा सामुदायिक आक्रंदनाचा आवाज देवापर्यंन्त पोहोचतो आणि मग दयाळु भगवंत संतरूपात अवतार घेतो. सृष्टी त्यासाठी उचित तयारी, भुमि-भुमिका तयार करते.

आता तीच तयारी सुरू झाली होती. म्हाळसा नावाच्या एका पतिव्रतेच्या पवित्र कुशीतुन जन्म घेण्यासाठी एक महान शिवयोगी उचित समयाची प्रतिक्षा करीत होते. सर्वसामान्य माणसांचा जन्म नैसर्गिक पध्दतीने व नैसर्गिक मार्गाने होतो.

अवतारी महापुरूषांचा जन्म देखील सकृतदर्शनी तसा वाटतो. मात्र भुमि आणि भुमिका यामध्ये सामान्यजन आणि संतजन यांच्या जन्म घटनेत महद् अंतर असते. ज्या पवित्र कुळात अशा संतांचा जन्म घडतो त्या कुळाची पुण्याई, परमार्थप्रवण जीवन प्रणाली, सदाचार आणि सात्विकता असावीच लागते.

"पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ॥"

इतर कामासाठी वापरायचे भांडे आणि दुध ठेवायचे भांडे यात फरक करतात. कारण दुध टिकावे म्हणुन त्या भांडयाच्या स्वच्छतेसाठी प्रकर्षाने लक्ष द्यावे लागते.

महापुरूषांच्या जन्मासाठी मातेची कुस किती पवित्र असावी लागते याचे दर्शन आज पर्यंतच्या संत चरित्रातुन त्यांना जन्म देणाऱ्या दिव्य मातृत्वाच्या माहितीतुन घडते. भगवद्भक्तीत ज्यांची अखंड मती असते अशाच मातृत्वास हे महद्भाग्य लाभु शकते. अन्यथा -

"नाही तरी काय थोडी । श्वान शुकरे बापुडी"

हेच दृष्य दिसते.

अवघड गणित सुटत नाही म्हणुन ते सोडविण्यासाठी विद्यार्थ्याने कितीही जागा बदलल्या तरी गणित सुटणे अवघडच होते. अर्थातच गणिताच्या साधनेसाठी भुमिचे वैशिष्टयाची मुळीच आवश्यकता नसते.

पुढील भाग क्रमशः

#जनार्दनमाऊली #जनार्दन #माऊलींचीअमृतवाणी #जनार्दनमाऊलींचीअमुतवाणी #janardanmauli #janardan #janardanswami #viral

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज यांची जीवनगाथा

 सद्गुरू महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज – जीवन गाथा  वैयक्तिक परिचय व जीवनप्रवास  एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते लाखो भाविकांचे श्रद्...